वृध्देचा बळी घेणाऱ्या कळपातील हत्तीणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 12:07 PM2023-12-31T12:07:38+5:302023-12-31T12:08:10+5:30
वाढोणा येथील घटना : पीक संरक्षणासाठीच्या तारेत सोडला होता विद्युत प्रवाह
जोगीसाखरा /वैरागड (जि. गडचिरोली) : रानटी हत्तीच्या हल्ल्यात वृध्द महिलेचा बळी गेल्याची घटना २९ डिसेंबरला मध्यरात्री आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे घडली होती. याच जंगल परिसरातील वाढोणा येथे ३१ डिसेंबरला पहाटे एका हत्तीणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शेतात पिकाच्या राखणीसाठी तारेत सोडलेल्या विद्युत प्रवाहाने तिचा घात झाला.
आरमोरी तालुक्यातील वाढोणा येथील रघुनाथ नारनवरे यांनी आपल्या शेतातील पिकाचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी कुंपणातील तारेत विद्युत प्रवाह सोडला होता. ३१ डिसेंबरलापहाटे तीन वाजता या तारेस स्पर्श झाल्याचे हत्तीणीचा बळी गेला. अजस्त्र हत्तीणीला पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील ढोंडणे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.
संबंधित शेतकऱ्यावर गुन्हा नोंदवून अधिक तपास केला जाईल, असे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल यांनी सांगितले.
ड्रोनमध्ये हत्तीण आढळली मृतावस्थेत
या भागात रानटी हत्तींवर वॉच ठेवण्यासाठी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. एका कॅमेऱ्यात पहाटे तीन वाजता ही हत्तीण मृतावस्थेत आढळली. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली असता विजेच्या धक्क्याने तिचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली. शंकरनगर येथे एक वृद्ध महिलेचा बळी घेतल्यानंतर याच कळपातील हत्तीणीचाही मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, वन्यप्राण्यांनी धुडगूस घातल्याने उत्तर गडचिरोलीत सध्या भीतीचे वातावरण आहे.