जीवंत तारांच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 01:13 AM2019-03-23T01:13:46+5:302019-03-23T01:14:49+5:30
मका पिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या तारेच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. या कुंपनाच्या जीवंत तारेला स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील शेतात घडली. रमेश लक्ष्मण आत्राम (३१), दौलत बुच्चा मडावी (४१) दोघेही रा. मुलचेरा असे मृतकांची नावे आहेत.
मुलचेरा : मका पिकाच्या संरक्षणासाठी लावलेल्या तारेच्या कुंपनाला विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. या कुंपनाच्या जीवंत तारेला स्पर्श होऊन दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मुलचेरा तालुक्यातील शेतात घडली.
रमेश लक्ष्मण आत्राम (३१), दौलत बुच्चा मडावी (४१) दोघेही रा. मुलचेरा असे मृतकांची नावे आहेत. रमेश व दौलत हे दोघेही बुधवारच्या रात्रीपासूनच गायब होते. मात्र होळीचा सण असल्याने एखाद्या ठिकाणी गेले असावे, असा अंदाज घरच्यांनी बांधला. त्यामुळे रात्रभर त्यांची शोधाशोध केली नाही. मात्र गुरूवारी सकाळीही ते परत आले नाही. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध घेतली असता, दोघांचेही मृतदेह रणजीत हलदार यांच्या शेतात आढळून आले.
हलदार यांनी वन्यजीवांपासून मक्याच्या पिकाच्या संरक्षणासाठी शेतासभोवताल तारेचे कुंपन लावले होते. या कुंपनाला त्यांनी विद्युत प्रवाह सोडला होता. दोघांचाही तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शेतमालक रणजित हलदार व जयदेव हलदार यांच्यावर गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली. या दोघांच्याही विरोधात भादंवि कलम ३०४/३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रमेश आत्राम याला पत्नी, आई-वडील व दोन मुली आहेत. आई-वडील वयोवृध्द आहेत. दौलत मडावी याला मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. रंगपंचमीच्या दिवशी गावात घटना घडल्याचे उघडकीस आल्याने गावात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, दोघेही जनावरे शोधण्यासाठी गेले होते, अशी माहिती मृतकांच्या नातेवाईकांनी दिली. मात्र मक्याच्या शेतीत रात्री १० वाजता दोघेही गेल्याने ते मक्याची कणसे चोरण्यासाठी गेले असावेत अशी चर्चा गावकऱ्यांकडून केली जात आहे. अन्यथा तेवढ्या रात्री शेतात जाण्याचे दुसरे कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शोधमोहिमेचा महावितरणला विसर
कुंपनाला विजेचा प्रवाह सोडल्याने वन्यजीवांचा मृत्यू होतो. हे प्रकार थांबविण्यासाठी महावितरणने मागील वर्षी शोधमोहीम हाती घेतली होती. मात्र ही मोहीम काही दिवसांचा फार्स ठरली. यावर्षी मात्र शोधमोहीम राबविली जात नसल्याचे दिसून येत आहे. याचा गैरफायदा शेतकऱ्यांकडून घेतला आहे. शेतकºयांनी पिकांच्या संरक्षणाकरिता खुलेआम विद्युत प्रवाह सोडण्यास सुरूवात केली आहे.