‘जीबी’त गाजला रस्त्याच्या कामातील बोगसपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:38 AM2018-02-03T00:38:16+5:302018-02-03T00:38:36+5:30
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी धानोरा तालुक्यातील रस्त्याच्या कामात कंत्राटदार व अभियंत्याने मिळून काढलेल्या बोगस कामाच्या बिलाचा मुद्दा चर्चेत राहिला. पेंढरीचे जि.प. सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनी उपस्थित केलेल्या या मुद््यावर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी धानोरा तालुक्यातील रस्त्याच्या कामात कंत्राटदार व अभियंत्याने मिळून काढलेल्या बोगस कामाच्या बिलाचा मुद्दा चर्चेत राहिला. पेंढरीचे जि.प. सदस्य श्रीनिवास दुलमवार यांनी उपस्थित केलेल्या या मुद््यावर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय इतर जि.प.सदस्यांनी विविध मुद््यांवर मागण्या केल्या.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला सर्व सभापती आणि विभाग प्रमुख उपस्थित होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल अनुपस्थित होते. त्यांची जबाबदारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सांभाळली.
या बैठकीत जि.प.सदस्य दुलमवार यांनी धानोरा तालुक्यात झालेल्या ढोरगट्टा, खरगी, पयडी या रस्त्याच्या खडीकरणाच्या कामातील गैरप्रकार चव्हाट्यावर आणला. १६ लाख ६७ हजारांच्या या खडीकरणाच्या कामावर केवळ ५०-५० ट्रीप मुरूम टाकून १० लाख रुपयांचे बिल काढण्यात आले. उपविभागीय अभियंता रूपारेल सुटीवर असताना प्रवारी अभियंता शिरपूरकर यांनी हे बिल मंजूर केले. एवढेच नाही तर तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता बेंडकुले यांनीही शहानिशा न करता त्या बिलावर सही केल्याचा आरोप दुलमवार यांनी केला. वास्तविक शिरपूर हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले होते पण त्यांचे निलंबन व्हायचे असताना त्यांनी मागील तारखांमध्ये बिल काढल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी जि.प.सदस्य अतुल गण्यारपवार, अॅड.राम मेश्राम यांनी केली. त्यामुळे अध्यक्षांच्या सूचनेनुसार चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्याचे आश्वासन विद्यमान कार्यकारी अभियंत्यांनी दिले.
जिल्हा निधीच्या कामांत एकाच कंत्राटदाराला २० कामे दिल्याचाही मुद्दा दुलमवार यांनी मांडला. तसेच रोजगार सेवकांना ५ वर्षांपासून प्रवास भत्ता व अल्पोपहार भत्ता नाही, १ वर्षांपासून मानधन नाही. त्याबाबत जाब विचारला असता निधीअभावी ही समस्या होती. मात्र आता निधी आला असून भत्ते, मानधन दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी अतुल गण्यारपवार यांनी जि.प. क्षेत्रात घरकुलांसाठी पैसे नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच गणपूर आणि जामगिरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, लखमापूर व कोनसरी येथे वाढीव पाणी पुरवठा योजना आणि उमरी, रशमीपूर येथे बंधारे देण्याची मागणी केली. याशिवाय चामोर्शीतील जि.प. केंद्र शाळेला एक वर्गखोली मंजूर झाली तरी आणखी एका खोलीची गरज असून ती मंजूर करण्याची मागणी केली.
राम मेश्राम यांनी अंगणवाड्यांना बोगस आहार पुरवठा केला जात असून पुरवठ्याच्या कंत्राटाची प्रक्रिया नव्याने करण्याची मागणी केली.