घरकूल लाभार्थ्यांवर कर्जबाजारी होण्याची पाळी

By Admin | Published: September 25, 2016 01:42 AM2016-09-25T01:42:18+5:302016-09-25T01:42:18+5:30

शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत सन २०१५-१६ या वर्षात अहेरी तालुक्यात १ हजार ९३ घरकूल मंजूर करण्यात आले.

Debt turnover on home loan beneficiaries | घरकूल लाभार्थ्यांवर कर्जबाजारी होण्याची पाळी

घरकूल लाभार्थ्यांवर कर्जबाजारी होण्याची पाळी

googlenewsNext

अहेरी तालुक्यातील प्रकार : अनुदान देण्यास पं.स.ची दिरंगाई
जिमलगट्टा : शासनाच्या इंदिरा आवास योजनेंतर्गत सन २०१५-१६ या वर्षात अहेरी तालुक्यात १ हजार ९३ घरकूल मंजूर करण्यात आले. अग्रीम स्वरूपात अनुदान मिळाल्यानंतर अनेक लाभार्थ्यांनी दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याच्या अनुदान रक्कमेची प्रतीक्षा न करता कर्ज काढून घरकुलाचे काम अंतिम टप्प्यात नेले. अशा जिमलगट्टा भागातील अनेक घरकूल लाभार्थ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम पंचायत समिती प्रशासनाने अद्यापही दिली नाही. त्यामुळे अनेक घरकूल लाभार्थी कर्जबाजारी झाले आहेत.
शासनाच्या इंदिरा आवास योजनेची अंमलबजावणी जिल्हास्तरावरील जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणा व तालुकास्तरावरील पंचायत समिती यंत्रणेमार्फत केली जाते. घरकूल मंजूर झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना शासनाकडून तीन टप्प्यात अनुदान दिले जाते. संबंधित लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम तत्काळ सुरू करावे, यासाठी प्रशासनाच्या वतीने सुरूवातीला अग्रीम स्वरूपात पहिल्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम लाभार्थ्याला अदा केली जाते. मात्र दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याची रक्कम देण्यास अहेरी पंचायत समिती प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. घरकूल लाभार्थ्यांनी जोता बांधून तीन फुटापर्यंत घरकुलाचे काम केल्यावर दुसऱ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम देण्याचा शासकीय नियम आहे. घरकुलाचे १०० टक्के काम पूर्ण केल्यानंतर शेवटच्या तिसऱ्या हप्त्याची रक्कम अदा केली जाते. जिमलगट्टा परिसरातील अनेक घरकूल लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम अहेरी पंचायत समिती प्रशासनाकडून सहा महिन्यांपासून देण्यात आली नाही. अनेक लाभार्थ्यांनी अहेरी पंचायत समिती गाठून या संदर्भात चौकशी केल्यानंतर लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम टाकल्या जाईल. ‘तुम्ही संबंधित बँक शाखेत जाऊन याबाबत चौकशी करा, असे उत्तर पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून वारंवार घरकूल लाभार्थ्यांना दिले जात आहे.
मार्च २०१६ पर्यंत लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम पूर्ण करावे, असे अहेरीच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर सभा घेऊन सांगितले होते. मार्चपर्यंत घरकुलाचे काम न झाल्यास संबंधित लाभार्थी घरकुलाच्या लाभापासून वंचित राहतील. तुम्हाला अनुदानाची रक्कम मिळणार नाही, असे बीडीओंनी सभेमध्ये लाभार्थ्यांना सांगितले होते.
आपले हक्काचे घरकूल परत जाणार या भितीपोटी जिमलगट्टा भागातील अनेक लाभार्थ्यांनी शासनाकडून अनुदान मिळण्याची प्रतीक्षा न करता कर्ज काढून घरकुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचविले. मात्र अशा लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याची ३७ हजार रूपयांची रक्कम सहा महिने उलटूनही पंचायत समिती प्रशासनाकडून मिळाली नाही, अशी माहिती रसपल्ली येथील घरकूल लाभार्थी रामुलू कोंडागुर्ले, शंकर गोमासे, मलय्या दुर्गम, मेडपल्ली येथील लक्ष्मण आत्राम, तुळशीराम येलम, यंकाबंडा येथील रंगा सिडाम, सुरेश आत्राम तसेच पत्तीगाव येथील वंजा मडावी, समा मडावी आदी लाभार्थ्यांनी सांगितले. सदर लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचविले आहे. मात्र पं.स. प्रशासनाच्या अडेलतटू धोरणामुळे जिमलगट्टा भागातील शेकडो लाभार्थी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. (वार्ताहर)

७० किमीचा प्रवास
अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा भागातील रसपल्ली, पत्तीगाव, मेडपल्ली गावातील अनेक घरकूल लाभार्थी दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याच्या अनुदान रक्कमेसाठी वारंवार अहेरीचे पंचायत समिती कार्यालय गाठून चौकशी करीत आहेत. मात्र कार्यालयीन कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळत असल्याने घरकूल लाभार्थी त्रस्त झाले आहेत. पंचायत समिती कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने प्रवासापोटी घरकूल लाभार्थ्यांना पदरचे पैसे खर्च करावे लागत आहे.

Web Title: Debt turnover on home loan beneficiaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.