कर्जमाफीच्या ४८८३ अर्जात गडबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:47 AM2018-01-20T00:47:13+5:302018-01-20T00:47:28+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कृषी कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील ४ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या माहितीत विसंगती आढळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आॅनलाईन भरलेली माहिती, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कृषी कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील ४ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या माहितीत विसंगती आढळली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आॅनलाईन भरलेली माहिती, बँकांनी पाठविलेली माहिती आणि सेवा सहकारी सोसायट्यांकडील माहिती पडताळून माहितीची पुनर्पडताळणी केली जात आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील २८ हजार ९८४ शेतकऱ्यांना ७१ कोटी ४३ लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. ही रक्कम संबंधित थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करून त्यातून थकित कर्जाची रक्कम भरण्यात आली. आतापर्यंत ३३ हजार ७९८ शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. त्यापैकी ४३७ शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी होणे बाकी आहे. मात्र ४ हजार ८८३ शेतकऱ्यांच्या माहितीत ताळमेळ जुळत नसल्याचे आढळले. त्या शेतकऱ्यांची यादी त्यांच्या बँकेत लावण्यात आली आहे. तालुकास्तरावर सहायक निबंधकांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून आता त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यात शासकीय लेखा परीक्षक, संबंधित बँकेचे शाखाधिकारी आणि वि.वि.कार्यकारी संस्थांचे प्रतिनिधी हे कागदपत्रांची तपासणी करीत आहेत.
बँकेत निधी प्राप्त झाल्यावर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करून योजनेचा लाभ देणे व प्रोत्साहन अनुदान शेतकºयांच्या बचत खात्यात जमा करणे हा अंतिम टप्पा बँकांचा राहणार आहे.
प्रलंबित प्रकरणांसाठी तालुकास्तरीय समित्या
आतापर्यंत कर्जमाफी योजनेचा लाभ ज्यांना मिळाला नाही अशा शेतकऱ्यांमधील पात्रता निश्चित करण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती आता अंतिमरित्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या निश्चित करून पात्र शेतकºयांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. प्रलंबित प्रकरणांच्या याद्या बँकनिहाय प्रसिध्द करण्यात येत आहेत.
ज्या कारणास्तव प्रकरण प्रलंबित आहे ती कागदपत्रे शेतकऱ्यांकडून प्राप्त करून घेणे व त्या आधारे पात्र/अपात्र ठरविण्याबाबत अंतिम निर्णय घेणे, तसेच पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करणे आदी कामे ही समिती करणार आहे
पात्रता सिद्ध करु न लाभ घ्यावा !
ज्या शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज सादर केले, मात्र त्यांची प्रकरणे प्रलंबित आहे अशा सर्व शेतकºयांनी आपल्या कागदपत्रांसह ज्या ठिकाणाहून कर्ज घेतले आहे अशा बँकांच्या शाखाधिकाऱ्यांना भेटावे. आपल्या अर्जाच्या पात्रतेचे पुरावे सादर करावेत व या कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सीमा पांडे यांनी केले आहे. त्यामुळे शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे.