घोट तालुका निर्मितीचा निर्णय घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 01:09 AM2018-03-11T01:09:08+5:302018-03-11T01:09:08+5:30
गेल्या ३५ वर्षापासून घोट तालुका निर्मितीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. घोट परिसराच्या विकासासाठी तालुक्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र शासनाकडून यावर निर्णय घेण्यात आला नाही.
ऑनलाईन लोकमत
घोट : गेल्या ३५ वर्षापासून घोट तालुका निर्मितीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहे. घोट परिसराच्या विकासासाठी तालुक्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र शासनाकडून यावर निर्णय घेण्यात आला नाही. आता तरी विद्यमान राज्य सरकारने ठोस निर्णय घेऊन घोट तालुक्याची निर्मिती करावी, अशी मागणी घोट तालुका निर्माण संघर्ष समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.
खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे यांच्या नेतृत्वात घोट तालुका निर्माण संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची नुकतीच भेट घेऊन त्यांच्याशी तालुका निर्मितीच्या विषयावर चर्चा केली.
याप्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के, घोटचे सरपंच विनय बारसागडे, उपसरपंच साईनाथ नेवारे, विलास गण्यारपवार, विलास उईके, भगवान धोडरे, अनुप अध्येंकीवार आदी उपस्थित होते. घोट तालुक्याची निर्मिती करण्यात यावी, या मागणीला घोट, पेटतळा, सिमुलतला, नेताजी नगर, भाडभिडी बी, हळदवाही, मक्केपल्ली, माडेआमगाव, रेगडी, विकासपल्ली आदीसह परिसरातील बहुतांश ग्रामपंचायतीचे समर्थन आहे. निवेदनासोबत प्रस्तावित घोट तालुक्यात समाविष्ट २७ ग्रामपंचायत व ७० गावांची यादी, प्रस्तावित घोट तालुक्याचा नकाशा, चामोर्शी तालुका सरपंच संघटनेचे पत्र जोडण्यात आले आहे.