शेती उपयोगी जनावरे घटली
By admin | Published: August 11, 2015 01:58 AM2015-08-11T01:58:34+5:302015-08-11T01:58:34+5:30
पशुसंवर्धन विभागाच्या मार्फतीने २०१२ साली १९ वी पशुगणना करण्यात आली. या पशुगणनेचा अहवाल नुकताच प्रसीद्ध झाला
दिगांबर जवादे ल्ल गडचिरोली
पशुसंवर्धन विभागाच्या मार्फतीने २०१२ साली १९ वी पशुगणना करण्यात आली. या पशुगणनेचा अहवाल नुकताच प्रसीद्ध झाला असून त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील बैल, रेडे या शेती उपयोगी जनावरांची व गावठी गाय तसेच म्हैस यांची संख्या घटली असून बकऱ्या व मेंढ्या यांची संख्या वाढली असल्याचे दर्शविण्यात आले आहे.
देशामध्ये किती पाळीव जनावरे आहेत.त्यांची संख्या लक्षात यावी या उद्देशाने पशुसंवर्धन विभागाच्या मार्फतीने दर चार वर्षांनी पाळीव पशुंची गणना करण्यात येते. या पशुगणनेवरून देशातील जनावरांची संख्या वाढत आहे की, घटत आहे याचा अंदाज शासनाला बांधण्यास मदत होते. त्यानुसार आखावयाच्या योजना व पशुसंवर्धन विभागातील कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करण्यासाठी मदत होते.
१८ वी पशुगणना २००८ साली करण्यात आली होती. तर चार वर्षांनंतर १९ वी पशुगणना करण्यात आली. १८ व्या पशुगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात गाय व बैल यांची संख्या सुमारे ५ लाख ८२ हजार ६६१ एवढी होती. २०१२ साली करण्यात आलेल्या पशुगणनेमध्ये गाय व बैल यांची संख्या ५ लाख ८ हजार ५२२ असल्याचे दर्शविण्यात आले आहे. म्हणजेच गाय व बैल यांची संख्या मागील चार वर्षांच्या कालावधीत सुमारे ७४ हजार १३९ ने घटली आहे. १८ व्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात सुमारे १ लाख ६ हजार ३०८ म्हशी व रेडे होते. १९ व्या जनगणनेमध्ये त्यांची संख्या ७६ हजार ३७२ एवढी असल्याचे दर्शविण्यात आले आहे. म्हणजेच म्हशींची संख्यासुध्दा २९ हजार ९३६ ने घटली आहे. २००८ च्या जनगणनेत शेळ्यांची संख्या २३ हजार ९५८ एवढी होती. २०१२ च्या जनगणनेमध्ये त्यांची संख्या २ लाख ५७० असल्याचे दर्शविण्यात आले आहे. यावरून शेळ्यांची संख्या १ लाख ७६ हजार ६१२ ने वाढली आहे. त्याचबरोबर मेंढ्यांची संख्या सुध्दा ५ हजार ९१३ ने वाढली आहे. पशु जनगणनेच्या अहवालाचा अभ्यास केल्यास शेती उपयोगी व गावठी जनावरांची संख्या घटत चालली आहे. मात्र तर दुसरीकडे संकरीत जनावरे वाढत चालली आहेत. मेंढ्या, बकरे, डुकर, कोंबड्या आदींचा उपयोग मांसाहारासाठी केला जातो. त्यांची संख्या वाढली आहे. यावरून पशुपालक ज्या पशुंना चांगली किंमत मिळते त्यांचेच पालन करीत असल्याचे दिसून येत आहे.
कृषी यंत्रांनी कमी केले बैलांचे महत्त्व
४दिवसेंदिवस शेतीमध्ये ट्रॅक्टरसह इतर कृषी यंत्रांचा वापर शेतकरी वाढवित चालला आहे. त्यामुळे बैलांची गरज राहिलेली नाही. एक महिन्याच्या शेतीसाठी ११ महिने बैलांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे शेतकरी वर्ग ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकून शेतीची नांगरणी करण्यावर भर देत चालला आहे. त्याचबरोबर एक ते दोन एकर शेती असलेल्या शेतकऱ्याला ५० हजार रूपयांची बैलजोडी घेणे शक्य होत नाही. त्यामुळे तो भाड्याने ट्रॅक्टर करून शेतीची मशागत करण्यावर भर देत आहे.
दुधाची बाजारपेठ नसल्याने म्हशी घटल्या
४गडचिरोली जिल्ह्यात दुधाची बाजारपेठ नाही. त्याचबरोबर चराईचे क्षेत्र कमी झाल्याने म्हशी चारण्याचा प्रश्न पशुपालकांसमोर निर्माण झाला. त्यामुळे म्हशी पाळण्यास सहजासहजी शेतकरी वर्ग तयार होत नाही. शहराजवळच्या शेतकऱ्यांना दुधापासून थोडेफार उत्पन्न मिळते. मात्र दुर्गम भागातील पशुपालकांना उत्पन्न मिळत नाही. परिणामी म्हशींची संख्या मागील चार वर्षांत घटली आहे.