झिंगानूर व देचलीपेठात तीव्र पाणी टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 11:47 PM2018-04-08T23:47:39+5:302018-04-08T23:47:39+5:30
अहेरी तालुक्यातील देचलीपेठा व सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे पाणी टंचाईची सावट निर्माण झाले आहे. महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने महिला वर्ग त्रस्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा/झिंगानूर : अहेरी तालुक्यातील देचलीपेठा व सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर येथे पाणी टंचाईची सावट निर्माण झाले आहे. महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याने महिला वर्ग त्रस्त झाला आहे.
देचलीपेठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एक विहीर व हातपंप आहे. मात्र विहीर आटली असून हातपंपातून गढूळ पाणी निघत आहे. सदर पाणी आरोग्यास घातक असल्याने रूग्ण व नातेवाईक या नळाचे पाणी पिण्यासाठी वापरू शकत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातच निवासस्थाने आहेत. कर्मचाऱ्यांनाही तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गावापासून दूर अंतरावर आहे. त्यामुळे पाणी आणण्यास अडचण निर्माण होते. दरवर्षीच उन्हाळा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी दरवर्षीच पाणी टंचाई निर्माण होते. पाणी टंचाईची समस्या सोडविण्यासाठी आणखी एक बोअर खोदण्यात यावा, अशी मागणी अनेकवेळा वरिष्ठांकडे केली आहे. मात्र याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या कायम आहे.
झिंगानूरचा परिसर पाणी टंचाईसाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिध्द आहे. झिंगानूर गावात डिसेंबर महिन्यापासूनच पाणी टंचाईला सुरूवात होते. पावसाळ्याचे जेमतेम चार ते पाच महिने सोडले तर पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाण्याची टाकी बांधण्यासाठी चार वर्षांपासून सर्वे होत आहे. परंतु पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू झाले नाही. झिंगानूर चेक नंबर १, झिंगानूर चेक २, झिंगानूर माल या तीन गावात पाणी टंचाईची समस्या गंभीर झाली आहे. विकासाच्या बाबतीत सदर भाग मागासला आहे. त्यामुळे नागरिकांना दारिद्र्याचे जीवन जगावे लागत आहे. त्याचबरोबर आता पाणी टंचाईचीही झळ बसत आहे.
मत मागण्यासाठी गावात आलेल्या लोकप्रतिनिधीने अनेकवेळा पाण्याची टाकी उभारण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र प्रत्यक्षात निवडणुकीत विजयी झाल्यानंतर या भागाकडे लोकप्रतिनिधी फिरकत नाही. पाणी टंचाईच्या समस्येवर अनेकांनी निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र झिंगानूरातील पाणी टंचाई मिटली नाही.
नदी असूनही दुष्काळाचे सावट
झिंगानूर गावापासून आठ किमी अंतरावर इंद्रावती नदी आहे. या नदीवर उपसा जल सिंचन योजना बांधल्यास या परिसरात सिंचनाची सुविधा होऊ शकते. ही बाब जिल्हा परिषद सदस्य, आमदार यांच्या अनेकवेळा लक्षात आणून दिली आहे. मात्र जलसिंचन योजना बांधली नाही. या भागात धानाचे पीक घेतले जाते. धानासाठी सुपीक जमीन व पोषक वातावरण असल्याने धानाचे पीक चांगले येते. मात्र पावसाळा संपल्यानंतर पाण्याचा दुष्काळ पडून पीक करपते. परिणामी धानाच्या उत्पादनासाठी झालेला खर्च सुध्दा निघत नाही.
उपसा जलसिंचन योजना झाल्यास काही शेतकरी आपल्या शेतात दुबार पीकही घेऊ शकतात. मात्र सिंचन उपलब्ध नसल्याने इच्छा असूनही ते उत्पादन घेऊ शकत नाही. लोकप्रतिनिधींनी या भागात उपसा जलसिंचन योजना मंजूर करावी, अशी मागणी आहे.