अंगाला हळद लागण्यापूर्वीच ‘दीपक’ मालवला!
By admin | Published: March 13, 2016 01:25 AM2016-03-13T01:25:47+5:302016-03-13T01:25:47+5:30
घरात अठराविश्व दारिद्र्य. शिक्षणासाठी पोषक वातावरणाचा अभाव. दुर्गम गावात सोयीसुविधांचे आबाळ अशा विपरित ...
विवाहाचे स्वप्न अधुरे :
नक्षल्यांच्या गोळीने सडमाके कुटुंबाचा आधार हिरावला
दिलीप दहेलकर गडचिरोली
घरात अठराविश्व दारिद्र्य. शिक्षणासाठी पोषक वातावरणाचा अभाव. दुर्गम गावात सोयीसुविधांचे आबाळ अशा विपरित परिस्थितीत कठोर परिश्रमाच्या बळावर अंगाराचा दीपक मुकुंद सडमाके हा गडचिरोली पोलीस दलात दाखल झाला. कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली. लग्न ठरवून सुखी जीवनाचे स्वप्न रंगवित असताना शुक्रवारी नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात दीपक शहीद झाला. त्याने विवाहाचे रंगविलेले स्वप्न क्षणात भंगले. दीपकच्या अंगाला हळद लागण्यापूर्वीच सडमाके कुटुंबाचा लाडका शूरवीर ‘दीपक ’ कायमचा मालवला!
दीपक सडमाके हा मूळचा कुरखेडा तालुक्यातील अंगारा येथील रहिवासी होता. त्याला सोनू नावाचा एक लहान भाऊ असून ममीता नावाची मोठी बहिण आहे. ममीता ही पोर्ला येथे सासरी वास्तव्य करीत आहे. दीपकच्या घरी केवळ एक एकर शेती असून त्याचे वडील शेती करतात. दहावी उत्तीर्ण झाल्यावर दीपकने पोलीस भरतीची तयारी सुरू केली. कठोर परिश्रम करून दीपक २५ मे २०१२ रोजी पोलीस विभागाच्या क्युआरटी पथकात पोलीस शिपाई पदावर रूजू झाला.
नोकरीला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याने लग्न करण्याचा विचार केला. दरम्यान जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला गोंदिया जिल्ह्यातील करांडी येथील एका सुसंस्कृत युवतीशी दीपकचे लग्न जुळले. त्यानंतर २० जानेवारीला दीपक व त्याच्या भावी वधूच्या साक्षगंधाचा कार्यक्रमही झाला. दीपकचे लग्न २६ ते २७ एप्रिल २०१६ ला त्याच्या स्वगावी अंगारा येथे होणार होते. दीड महिन्यानंतर तो भावी पत्नीशी लग्नाच्या बेडीत अडकणार होता. मात्र शुक्रवारी हेडरी पोलीस ठाण्याच्या समोर आठवडी बाजारात कर्तव्यावर असतानाच नक्षल्यांच्या गोळीचा दीपक निशाना ठरला. हल्ल्यात घटनास्थळीच दीपक शहीद झाला. सदर बातमी कळताच भावीवधूसह दीपकच्या कुटुंबातील सदस्यांवर दु:खाचे पहाड कोसळले. दीपकने अर्ध्यावरच जग सोडल्याने त्याच्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध अनावर झाला.