कमजोर उमेदवारांमुळे काँग्रेसचा पालिकेत पराभव
By admin | Published: January 3, 2017 12:55 AM2017-01-03T00:55:49+5:302017-01-03T00:55:49+5:30
नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचे बहुतांश उमेदवार कमजोर होते.
विजय वडेट्टीवार यांची माहिती : ६ व ८ ला नोटाबंदीविरोधात काँगे्रसचे जिल्हाभर आंदोलन
गडचिरोली : नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचे बहुतांश उमेदवार कमजोर होते. काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांमध्ये निवडणुकीदरम्यान समन्वयाचा अभाव होता. त्याचबरोबर निवडणुकीदरम्यान भाजपच्या वतीने २ हजार रूपयांच्या नवीन नोटा भरपूर प्रमाणात मतदारांना वाटल्या. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड पराभवाचा सामना करावा लागला. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र ही चूक होऊ देणार नाही, अशी माहिती काँग्रेसचे विधानसभेतील उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे मोडकळीस आली आहे. शेतकरी, गरीब तसेच सर्वसामान्य व्यक्तीचे हाल होत आहेत. केंद्र शासनाच्या अन्यायकारक धोरणांचा विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने ६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांना घेराव घातला जाणार आहे. तर ८ जानेवारी रोजी काँग्रेसच्या विविध सेलच्या वतीने संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना घेराव घातला जाणार आहे, अशीही माहिती आ. विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षानिमित्त देशाला संबोधित करताना अर्थमंत्र्यांप्रमाणे भाषण करून विविध योजनांची घोषणा केली. मात्र काळा पैसा नेमका किती जमा झाला, हे सांगितले नाही. राज्यातील एकूण गावांपैकी सुमारे ४४ हजार १९८ गावांमध्ये बँकेची सुविधा नाही. त्यामुळे या गावातील नागरिक कॅशलेस व्यवहार कसे करणार, असा प्रश्न उपस्थित केला. देशात भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या घरी मोठ्या प्रमाणात २ हजार रूपयांच्या नवीन नोटा आढळून आल्या. या निर्णयामुळे जगभरात भारताचे हसे झाले आहे. पोकळ आश्वासने देऊन राज्य व केंद्र सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात काँग्रेसच्या नेतृत्वात ६ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तसेच ८ जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. जनतेने या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जीवन नाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार, माजी नगराध्यक्ष राम मेश्राम, माजी आ. पेंटारामा तलांडी, नगरसेवक सतीश विधाते, पंकज गुड्डेवार, शंकरराव सालोटकर, पांडुरंग घोटेकर, पी. टी. मसराम उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
प्रशासनाने रेतीबाबत पुरविली चुकीची माहिती
गोदावरी पुलाच्या लोकार्पणाप्रसंगी व राष्ट्रीय महामार्गांच्या भूमिपूजनाप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेतीपासून मिळणारे महसूल वाढल्याचा उल्लेख केला. एवढेच नाही तर गोदावरी नदीतून ५० कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाल्याचे भाषणातून सांगितले. प्रत्यक्षात मात्र गोदावरी नदीतून दरदिवशी ३०० ते ४०० ट्रक रेती अवैधरितीने नेली जात आहे. पोकलँड, जेसीबी मशिनच्या सहाय्याने उत्खनन केले जात आहे. या रेती तस्करीमध्ये पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचा वाटा आहे. जिल्हाधिकारी खरच प्रामाणिक असतील तर त्यांनी रेती तस्करांवर कारवाई करावी.
मेडिगड्डा धरणाला महाराष्ट्र शासनाने राज्यपालांच्या दबावात परवानगी दिली आहे. मेडिगड्डा धरणाला पर्यावरण खात्याची परवानगी नसतानाही मंजुरी मिळाली. मेडिगड्डा धरणामुळे होणाऱ्या नुकसानीचा सर्वे तेलंगणा प्रशासनाने केला होता व या सर्वेक्षणावर राज्य शासनाने विश्वास ठेवत प्रकल्पाला परवानगी दिली. या धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावे जलमय होणार आहेत.
समविचारी पक्षांना घेऊन जिल्हा परिषद निवडणूक लढण्याचा विचार काँग्रेस करीत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान विधानसभा, तालुका व जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय मेळावे घेण्यात येतील. केंद्र व राज्य शासनाचे चुकीचे धोरण जनतेपर्यंत पोहोचविले जाईल. मी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या स्क्रूटीनी समितीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांनाच प्रथम प्राधान्य दिले जाईल.
जिल्ह्यात उद्योग उभारण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र प्रत्यक्षात संरक्षण देऊन ट्रकच्या माध्यमातून लोहखनिज बाहेर जिल्ह्यात नेले जात आहे. केंद्राच्या रस्ते विकास मंत्रालयाचा पूर्ण बजेट ५९ हजार कोटी रूपयांचा आहे. त्यापैकी १२ हजार कोटी गडचिरोली जिल्ह्याच्या रस्त्यांसाठी दिल्याचे ना. गडकरी यांनी सांगितले आहे. मात्र ही आकडेवारी फसवी आहे, असाही आरोप आ. विजय वडेट्टीवार यांनी केला.