पराभवावरही वादंगच
By admin | Published: May 18, 2014 11:32 PM2014-05-18T23:32:44+5:302014-05-18T23:32:44+5:30
गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. मोदी लाटेच्या झंझावतामुळे पक्षाचा हा पराभव झाला, असा युक्तीवाद काँग्रेस पक्षाचे सर्वच
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर या लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला आहे. मोदी लाटेच्या झंझावतामुळे पक्षाचा हा पराभव झाला, असा युक्तीवाद काँग्रेस पक्षाचे सर्वच आमदार व बहुतांश नेते करीत आहे. मात्र काँग्रेसचा सर्वसामान्य कार्यकर्ता पक्षाचा हा पराभव राज्य सरकारची नार्केता व लोकप्रतिनिधी, आमदार यांचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे झालेले दुर्लक्ष सत्तेमुळे अंगात शिरलेला अहंकार, मतदार संघाकडे लक्ष न देता भारताच्या विविध राज्यांमध्ये वर्षातून किमान २ महिने तरी दौरा करणारे लोकप्रतिनिधी ही पराभवाची कारणे आहेत, असे सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. एकूणच दारूण पराभवावरही काँग्रेस पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यात एक स्वर नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे काँग्रेस या पराभवापासून काही बोध घेईल, अशी स्थितीमात्र सध्यातरी दिसून येत नाही, अशी भावना अनेक जुन्या काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा क्षेत्र येतात. यातील दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. तर अहेरी विधानसभा क्षेत्रात लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस पक्षाला मानणारे सहयोगी अपक्ष आमदार होते. मागील चार वर्षात राज्य सरकारने गडचिरोली जिल्ह्यासाठी अनेक निर्णय केले. स्वतंत्र विद्यापीठ दिले, गडचिरोलीसाठी स्वतंत्र महिला रूग्णालय दिले, सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीच्या पुलाचे काम सुरू केले, कोटगल, चिचडोह बॅरेजसारख्या सिंचन योजना सुरू केल्या, अनेक शासकीय इमारती उभ्या केल्या, तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार ग्रामपंचायतीला दिले, बंगाली बांधवांना जमीनपट्टे दिले, असे असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आमदार जनतेपर्यंत हे विकास कामे घेऊन जाण्यात अपयशी ठरले आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात काँग्रेसचा २ लाख ३६ हजारावर अधिक मताचा पराभव झाला. यातील किमान १ लाख ८० हजार मताचा पराभव आमदारांची अॅन्टी इनकंबन्शीच्या खात्यावरच मोडणारा आहे. प्रत्येक काँग्रेस आमदाराच्या मतदार संघात किमान २५ ते ३० हजाराची माघार अशीही होणारच होती व मतदानानंतर काँग्रेस नेतेही ही बाब गडचिरोली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघाबाबत कबूल करीत होते, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मतपेटी फुटल्यानंतर मोदीलाट दिसून आली. निवडणुकीत प्रचाराला फिरताना काँग्रेसच्या कुण्याही नेत्याला मोदीलाट दिसली नाही. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी मोदीलाटेचा वापर आता काँग्रेसचे लोकप्रतिनिधी व नेते करीत आहे. गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात ग्रामीण भागातील लोकांपर्यंत लोकप्रतिनिधी त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी जात नाही. प्रश्न सुटो न सुटो आमदार आपल्याला भेटला याचे समाधान हे सामान्य मानसासाठी महत्वाचे आहे. हे या निकालाने काँग्रेसला सांगितले आहे. अशोक नेते यांचा मागील पाच वर्षाचा संपर्क त्यांच्या विषयासाठी महत्वाचा ठरला, ही बाब आज काँग्रेस कार्यकर्ते खासगी चर्चेतही मान्य करीत आहे. काँग्रेसचे आमदार गरीब माणसापर्यंत जातच नाही. गावपुढार्यांना भेटून परत येतात, ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, असे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गेल्या १० वर्षाच्या काळात आमदारांच्या भोवती निर्माण झालेले वलय ही आर्थिक समृध्दीची साक्ष देणारा आहे. काँग्रेस पक्ष या प्रचारालाही तोंड देण्यात कमी पडला. काँग्रेस पक्षाचे खिळखिळ झालेले पक्ष संघटन पुन्हा बांधण्याची गरज आहे. बहुजन समाजाचा जिल्हाध्यक्ष असताना आजवर काँग्रेसची कधीही एवढीमोठी वाताहत झाली नाही, ही बाबही अनेक नेते व कार्यकर्ते आता बोलून दाखवित आहे. पक्ष संघटन पुन्हा योग्य लोकांच्या हातात सोपविण्याची गरज आहे. गटातटाचा विचार न करता पुन्हा तयारी करावी लागणार आहे, असे कार्यकर्ते म्हणतात.