देलनवाडी, कढाेली केंद्रावर बारदाण्याचा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:24 AM2021-06-10T04:24:56+5:302021-06-10T04:24:56+5:30
आदिवासी विकास महामंडळाने रब्बी धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले; पण नियोजनाचा अभाव असल्याने ५० टक्के शेतकऱ्यांचे रब्बी ...
आदिवासी विकास महामंडळाने रब्बी धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले; पण नियोजनाचा अभाव असल्याने ५० टक्के शेतकऱ्यांचे रब्बी धान खरेदी शिल्लक असताना संस्थेकडील बारदाना संपला आहे. आरमोरी तालुक्यातील देलनवाडी खरेदी केंद्रावर या वर्षात बारदाना उपलब्ध झाला नाही. या केंद्रावर खरीप हंगामातील शिल्लक असलेला ८ हजार बारदाना त्या आधारावर खरेदी झाली. रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी संस्थेने मागणी करूनही बारदाना उपलब्ध झाला नाही, तर कुरखेडा तालुक्यातील कढाेली केंद्रावर ९ हजार बारदाना उपलब्ध झाला होता. तेवढ्या बारदान्यामध्ये खरेदी झाली आहे. आदिवासी विकास महामंडळाने अभिकर्ता संस्थांना रब्बी धान खरेदीचे निर्देश दिले, मात्र खरिपाच्या धानाची उचल न झाल्याने जागेची अडचण होती. जिल्ह्यातील काही खरेदी केंद्राने जागेचा प्रश्न निकाली काढल्यानंतर केंद्र सुरू होऊन पाच ते सहा दिवसांतच बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे संस्थांची मोठी अडचण झाली आहे. धान खरेदीत होणाऱ्या अडचणीचा सामना संस्थांना करावा लागत असून, अभिकर्ता संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला बळी पडावे लागत आहे. संस्थांकडील उपलब्ध बारदाना संपल्यानंतर धान विकणारे शेतकरी स्वतःचा बारदाना वापरून देण्यास तयार आहे. मागील दोन वर्षांत आदिवासी विकास महामंडळाने शेतकऱ्यांच्या बारदान्यापाेटी प्रती बारदाना २० रुपयेप्रमाणे देण्याचे ठरवले होते. मात्र, शेतकऱ्यांनी जो बारदाना दिला, त्याचे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी स्वतःचा बारदाना देऊन धान विक्रीस तयार होत नाही. सध्यातरी शेतकरी आणि संस्थांसमोर बारदाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.