देवलमरी ग्रा.पं.ला गांधी जयंतीचा विसर
By admin | Published: October 3, 2016 02:06 AM2016-10-03T02:06:30+5:302016-10-03T02:06:30+5:30
अहेरी तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या देवलमरी ग्रामपंचायतीला २ आॅक्टोबर रोजी रविवारला महात्मा गांधी जयंतीचा विसर पडला.
आमसभा व स्वच्छता अभियान बगल : नागरिक उपस्थित मात्र पदाधिकारी गायब
अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या देवलमरी ग्रामपंचायतीला २ आॅक्टोबर रोजी रविवारला महात्मा गांधी जयंतीचा विसर पडला.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधी यांनी आपले आयुष्य घालविले. ते सदैव स्मरणात राहावे तसेच त्यांचे विचार व कृती प्रत्यक्षात उतरावी यासाठी दरवर्षी २ आॅक्टोबर रोजी प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, शाळा, नगर पंचायत कार्यालयामध्ये गांधी जयंती साजरी करणे आवश्यक आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधून विशेष सभा घेणे, स्वच्छता अभियान राबविणे आवश्यक आहे. मात्र ग्रामपंचायत देवलमरीच्या पदाधिकाऱ्यांना, सचिवाला गांधी जयंतीचा विसर पडला. काही ग्रामस्थांनी दिलेल्या माहिती नुसार देवलमरीच्या सरपंच पेंटक्का पोरतेट या सकाळीच ग्रामपंचायत कार्यालयात आल्या. त्यानंतर ग्रा.पं. सचिव एम. ए. धुर्वे या सुद्धा कार्यालयात आल्या. मात्र अर्धा तास थांबून त्याही परतल्या. विशेष ग्रामसभा, स्वच्छता अभियान आणि गांधी जयंतीसाठी काही महिला, पुरुष, गावकरी तसेच महिला बचत गटाच्या सदस्या ग्रामपंचायत कार्यालयात आल्या. मात्र कोणीच नाही, कार्यक्रम कसा घ्यायचा, असे उत्तर ग्रामपंचायतमधून देण्यात आले. सरपंच वगळता एकही ग्रामपंचायत सदस्य रविवारी ग्रा.पं. कार्यालयात हजर नव्हते, अशी माहितीही ग्रामस्थांनी दिली.
विशेष म्हणजे आजच्या दिवशी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला प्रत्येक ठिकाणी पूजल्या जाते मात्र ग्रामपंचायत देवलमरीमध्ये महात्मा गांधी यांचा फोटो भिंतीवरच लटकलेला होता. गावातील विविध समस्या, ठराव आणि ईतर बाबी २ आॅक्टोबरच्या विशेष सभेत निकाली काढल्या जातात मात्र येथे असे काहीच झाले नाही. देवलमरी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी गांधी जयंती कार्यक्रमासाठी थोडाही वेळ दिला नाही. (प्रतिनिधी)
नोटीसमध्ये कार्यक्रमाची वेळ सकाळी १० वाजताची ठरविली होती. मी १० वाजेपासून ११.४५ वाजेपर्यंज ग्रामपंचायत कार्यालयात हजर होतो. मात्र कोरम पूर्ण होण्यासाठी पाहिजे असलेले संख्याबळ उपस्थित झाले नाही. त्यामुळे सभा रद्द करावी लागली. मी इंदाराम ग्रामपंचायतीचा स्थायी सचिव आहे. देवलमरीचा अतिरिक्त प्रभार माझ्याकडे आहे. इंदाराम ग्रामपंचायतमध्येही कार्यक्रम व सभा असल्याने आपण तिथे गेलो, ही बाब देवलमरीच्या सरपंचाना सांगितली आहे.
- एम. ए. धुर्वे, प्रभारी सचिव ग्रामपंचायत देवलमरी