आयकर जमा करण्यास विलंब
By admin | Published: June 11, 2017 01:29 AM2017-06-11T01:29:47+5:302017-06-11T01:29:47+5:30
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातून कपात केलेली आयकराची रक्कम ३१ मे नंतर सुध्दा जिल्हा कोषागार कार्यालयाने
सेवानिवृत्तांना भुर्दंड : जिल्हा कोषागार कार्यालयाचा नियोजनशून्य कारभार उजेडात
महेंद्र चचाणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातून कपात केलेली आयकराची रक्कम ३१ मे नंतर सुध्दा जिल्हा कोषागार कार्यालयाने आयकर विभागाकडे जमा केली नाही. उशिरा रक्कम जमा केल्याने याचा भूर्दंड सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पडणार आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी कोषागार कार्यालयाच्या कार्यप्रणालीबाबत संताप व्यक्त केला आहे.
अधिकारी, कर्मचारी, अनुदानित शाळेचे कर्मचारी यांचे वेतन जिल्हा कोषागार कार्यालयाच्या मार्फत राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जमा होते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यात आयकर बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातून आयकराची रक्कम कपात केली जाते. आर्थिक वर्ष २०१६-१७ या वर्षाची आयकराची रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयाने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यातच कपात केली. मात्र सदर रक्कम आता तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही आयकर विभागाकडे जमा केली नाही. आयकर रिटर्न फार्म सादर करण्यासाठी सेवानिवृत्त कर्मचारी आॅडीटर गेले असता, कपात झालेली रक्कम कोषागार कार्यालयाने आयकर विभागाकडे जमा केली नसल्याचे उघड झाले आहे.
आयकर विभागाच्या नियमानुसार तीन महिन्यांचा एक हप्ता याप्रमाणे वर्षाला चारदा आयकराची रक्कम चालानद्वारे आयकर विभागाकडे जमा करावी लागते. कोणत्याही परिस्थितीत आयकराची रक्कम आयकर विभगाकडे ३१ मे पर्यंत जमा झाली पाहिजे, असा नियम आहे. ३१ जुलैपर्यंत आयकराची रक्कम अदा केली असल्याचा रिटर्न फार्म सादर करून घ्यावा लागतो. ३१ मे नंतर आयकर विभागाकडे जमा केलेल्या आयकराच्या रकमेवर आयकर नियम २३ एई अंतर्गत प्रती दिवस २०० रूपये प्रमाणे विलंब शुल्क आकारले जाते. या व्यतिरिक्त आयकर नियम २०१ (१ ए) नुसार प्रती महिना १.५ टक्के व्याज आकारला जातो. आयकराची रक्कम अदा करण्याची नोटीस आयकर विभागाकडून दिली जाते. त्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयाकडून अद्याप भरणा न झालेल्या आयकरासाठी सेवानिवृत्त कर्मचारी दोषी नसतानाही त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे कोषागार विभागाविषयी त्यांच्यामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. यावर तोडगा काढावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.