भूखंडाअभावी आरोग्य केंद्र कामास विलंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2017 01:21 AM2017-01-04T01:21:03+5:302017-01-04T01:21:03+5:30
चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी भूखंड मिळत नसल्याने आरोग्य केंद्राच्या बांधकामाला विलंब होत आहे.
लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी भूखंड मिळत नसल्याने आरोग्य केंद्राच्या बांधकामाला विलंब होत आहे.
चामोर्शी तालुक्यातील लोकसंख्येच्या बाबत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या लखमापूर बोरीची लोकसंख्या सात हजार आहे. परंतु मागील १५ वर्षांपासून आरोग्यसेवेचा येथे अभाव आहे. अॅलोपॅथी दवाखाना बंद पडलेला आहे. आरोग्य उपकेंद्रातही डॉक्टरांची पदे भरण्यात आलेली नाही. येथील कार्यभार आरोग्यसेवक नराते, परिचारिका राऊत व दुर्गे चालवित आहेत. सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी सरळ तालुका किंवा जिल्हा दवाखाना गाठावा लागतो. त्यामुळे येथे आरोग्य केंद्र निर्माण व्हावे, अशी मागणी होती. त्यानंतर आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले. परंतु भूखंडाअभावी दोन वर्षांपासून त्याचे बांधकाम रखडून आहे. सुरुवातीला नवीन ग्रामपंचायतीच्या बाजुला इमारत बांधकामाचा आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु ४५ बाय ४५ मीटर जागेत बांधकाम करावयाचे असल्याने येथील भूखंड कमी पडला. त्यामुळे नव्याने जिल्हा परिषद शाळेच्या शेतात आरोग्य केंद्र बांधकामाचा आराखडा तयार करून तसा ठराव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला. नव्याने होणाऱ्या आरोग्य केंद्रासाठी कर्मचाऱ्यांची १५ पदे मंजूर करण्यात आले. परंतु अजूनही कामाला सुरुवात झाली नाही. हे आरोग्य केंद्र सुरू झाल्यास परिसरातील हळदी, हळदी माल, कान्होली, कळमगाव, बोरी, भिक्षी, वाकडी, नवीन वाकडी, रामसागर, बल्लू, वागधरा, मुरखळा आदी गावातील नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. (वार्ताहर)