हागणदारीमुक्तीत देसाईगंज तालुका जिल्ह्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 11:32 PM2017-08-14T23:32:48+5:302017-08-14T23:33:11+5:30
देसाईगंज तालुक्याने १०० टक्के शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करून हागणदारी मुक्तीत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज तालुक्याने १०० टक्के शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करून हागणदारी मुक्तीत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.
निर्मल भारत अभियानांतर्गत २०१२ मध्ये या तालुक्याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी १९ ग्रामपंचायतीमध्ये १२ हजार ९१५ कुटुंब होते. त्यातील ७ हजार २८ कुटुंबाकडे शौचालय नसल्याने त्यांना शौचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे होते. मागील तीन वर्षात तालुक्यातील कुटुंबांच्या भेटी घेऊन, स्वच्छता अभियान, नारळफोड कार्यक्रम, ग्रामपंचायत पदाधिकाºयांच्या वारंवार कार्यशाळा व सदैव गावात भेटी व शालेय प्रभातफेरी घेऊन ३१ मार्च २०१७ पर्यंत तालुका ९० टक्के हागणदारी मुक्त झाला. याबाबत १ मे २०१७ रोजी महाराष्टÑ दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. पुन्हा मागील तीन महिन्यात राहिलेले १० टक्के शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. आता या तालुक्यात १०० टक्के कुटुंबांकडे शौचालय उपलब्ध झाले असून सदर तालुका हागणदारीमुक्त झाला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्या नेतृत्वात देसाईगंजच्या संवर्ग विकास अधिकारी संगीता भांगरे, सभापती मोहन गायकवाड, उपसभापती गोपाल उईके, सहायक गट विकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे, विस्तार अधिकारी उमेशचंद्र चिलबुले, गट समन्वयक स्वाती लांजेवार, समुह समन्वयक अर्चना बडोले, केशव लोखंडे यांच्यासह देसाईगंज तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी तालुक्यातील सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, ग्रामरोजगार सेवक, नरेगा कर्मचारी, स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी, पंचायत समितीमधील अधिकारी, कर्मचारी यांनी नियोजनबध्द शौचालय बांधकामाचा उपक्रम राबविला. त्यामुळे इतर तालुक्यांना मागे टाकत देसाईगंज तालुक्याने हागणदारी मुक्तीकडे वाटचाल केली आहे. यापासून इतर तालुक्यांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे.