पालकमंत्र्यांना पदावरून हटवा
By admin | Published: February 11, 2016 12:12 AM2016-02-11T00:12:35+5:302016-02-11T00:12:35+5:30
गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या संस्थांतर्गत चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांमध्ये अडचणीत आहेत.
आॅल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची मागणी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या संस्थांतर्गत चालविल्या जाणाऱ्या वसतिगृहांमध्ये अडचणीत आहेत. येथे राहणाऱ्या व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रचंड अवहेलना होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी आॅल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष विनय बांबोळे, कार्यवाह देवानंद वालदे, संयोजक चांगदास मसराम, आशिष बांबोळे आदींनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अम्ब्रीशराव आत्राम यांच्या संस्थेमार्फत राजे धर्मराव मुलांचे वसतिगृह नागेपल्ली येथे चालविले जाते. या वसतिगृहात बाथरूम, किचन, स्वयंपाकासाठी साहित्य नाही, मागील चार महिन्यांपासून वसतिगृहात धान्य पुरवठा अत्यल्प प्रमाणात होत असल्याने विद्यार्थ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. फक्त दोन किलो तांदूळ, तेल, दाळ देऊन संस्थापक तथा पालकमंत्री विद्यार्थ्यांचे शोषण करीत आहे. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.
मंत्र्याच्या वसतिगृहात अशी परिस्थिती असेल तर राज्यात स्थिती किती गंभीर असावी, याची प्रचिती येते. त्यामुळे त्यांना त्वरित पदावरून दूर करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.