अनियमित शिक्षकांना हटवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 12:55 AM2019-08-20T00:55:17+5:302019-08-20T00:55:47+5:30
स्थानिक पंचायत समिती अंतर्गत लक्ष्मीपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक नेहमी गैरहजर राहत असल्याने शाळा गुणवत्तेवर परिणाम होत आहे, असा आरोप करीत येथील कार्यरत शिक्षकांची इतर शाळेत बदली करून या शाळेत नवे कर्तव्यदक्ष शिक्षक देण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पालकांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : स्थानिक पंचायत समिती अंतर्गत लक्ष्मीपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक नेहमी गैरहजर राहत असल्याने शाळा गुणवत्तेवर परिणाम होत आहे, असा आरोप करीत येथील कार्यरत शिक्षकांची इतर शाळेत बदली करून या शाळेत नवे कर्तव्यदक्ष शिक्षक देण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ व पालकांनी केली आहे.
यासंदर्भात १९ आॅगस्ट रोजी सिरोंचा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर शाळा समितीचे अध्यक्ष श्रीनिवास कुम्मरी, बकय्या कुम्मरी, ग्रा.पं.सदस्य लक्ष्मी कुम्मरी, शाळा समितीचे सदस्य महेंद्र कुम्मरी, कुम्मरी पोचम, अर्चना कुम्मरी, बापू दुर्गम, मगडी राजय्या, राजबापू कोंडा, मदनय्या कुम्मरी आदींच्या स्वाक्षºया आहेत.
गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा तालुका मुख्यालयापासून १० किमी अंतरावर लक्ष्मीपूर हे गाव असून येथे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. लक्ष्मीपूर व परिसरातील विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. मात्र येथील दोन शिक्षक गेल्या दोन महिन्यापासून सतत गैरहजर राहत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीनिवास कुमरी यांनी संबंधित शिक्षकांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शाळेतील एका शिक्षकाने पोलीस कारवाई करण्याची धमकी दिल्याचा आरोप कुमरी यांनी केला आहे.
आपण विद्यार्थी हिताच्या दृष्टीने शिक्षकांना कर्तव्याबाबत सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या अरेरावीपणामुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. त्यामुळे सदर शिक्षकांना येथून हटवून लक्ष्मीपूर शाळेत नव्या शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी पदाधिकाºयांसह ग्रामस्थांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास लक्ष्मीपूर शाळेला कुलूप ठोकणार, असा इशारा पालकांनी दिला आहे.
दुर्गम शाळांमध्ये एकच शिक्षक सांभाळतो वर्ग
सिरोंचा तालुका हा शेवटच्या टोकावर असून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा अतिदुर्गम भागात आहेत. जि.प.शाळांमध्ये दोन पेक्षा अधिक शिक्षक कार्यरत आहेत. मात्र शाळेचे सर्व शिक्षक नियमित शाळेत जात नाही. परिणामी अदलाबदली पद्धतीने ड्यूटी बजावतात. एकच शिक्षक संपूर्ण शाळा सांभाळत असतो.