शहीद कुटुंबांना मदतीचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:22 AM2019-05-29T00:22:58+5:302019-05-29T00:23:44+5:30
कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. शहिदांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत २८ मे रोजी वितरित करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. शहिदांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत २८ मे रोजी वितरित करण्यात आली.
अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते शहिदांच्या कुटुंबियांना ही मदत वितरित करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला १ कोटी ८ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी ५० लाख ५० हजार रुपये वितरित करण्यात आले. या मदतीसोबतच शहीद जवान सेवानिवृत्त होण्याच्या कालावधीपर्यंत पूर्ण वेतन त्याच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे. तसेच कुटुंबातील एका वारसास शिक्षण पात्रतेनुसार शासकीय नोकरी सुध्दा दिली जाईल, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग यांनी दिली.
शहीद पोलीस कुटुंबियांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी पोलिसांचा परिवार त्यांच्या पाठीशी राहून मदत करेल, असे आश्वासन राज्याचे अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग यांनी दिले आहे. उर्वरित मदत सुध्दा लवकरच देण्याचे आश्वासन अपर पोलीस महासंचालकांनी दिले.
वाहन चालकाच्या कुटुंबालाही मदत
या घटनेतील मृत खासगी वाहनाचा चालक तोमेश्वर सिंगनाथ यांच्या पत्नीला दोन लाख रुपये व आई-वडिलांना ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. वाहन मालक गहाणे यांनाही एक लाख रुपये वितरित करण्यात आले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी तोमेश्वर सिंगनाथ यांच्या आई-वडिलांना ५० हजार रुपये देण्यात आले होते. आतापर्यंत तोमेश्वरच्या कुटुंबियांना तीन लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. शासनाकडूनही आर्थिक मदत मिळावी, यासाठीचा प्रस्ताव पाठविला आहे. गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनातूनही काही रक्कम गोळा करून तोमेश्वरच्या कुटुंबियांना दिली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.