ट्रॅक्टर ट्रॉलीत महिलेची प्रसुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:24 AM2018-09-10T00:24:29+5:302018-09-10T00:25:13+5:30
गावापर्यंत रूग्णवाहिका जाऊ शकत नसल्याने आरोग्य कर्मचारी गर्भवती महिलेला रूग्णालयात भरती करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले. प्रसुतीसाठी तिला रूग्णालयात आणले जात असताना ती ट्रॅक्टर ट्रॉलीमध्येच प्रसुती झाली. मात्र सोबत आरोग्य कर्मचारी असल्याने माता व नवजात बालक दोघेही सुखरूप आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : गावापर्यंत रूग्णवाहिका जाऊ शकत नसल्याने आरोग्य कर्मचारी गर्भवती महिलेला रूग्णालयात भरती करण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले. प्रसुतीसाठी तिला रूग्णालयात आणले जात असताना ती ट्रॅक्टर ट्रॉलीमध्येच प्रसुती झाली. मात्र सोबत आरोग्य कर्मचारी असल्याने माता व नवजात बालक दोघेही सुखरूप आहेत.
भामरागड तालुका मुख्यालयापासून १३ किमी अंतरावर हितापडी हे गाव आहे. सदर गाव आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते. हितापडी येथील शांती राकेश पुंगाटी या गरोदर महिलेला रविवारी सकाळी १० वाजता प्रसुती कळा सुरू झाल्या. याबाबतची माहिती आरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली. महिलेला रूग्णालयात आणण्यासाठी रूग्णवाहिका पाठवण्यात आली. मात्र हिदूर नंतर हितापडी गावापर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही. केवळ पायवाट आहे. सततच्या पावसामुळे या पायवाटेवर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाले आहे. त्यामुळे रूग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकली नाही. मात्र प्रसवकळा सुरू झाल्याने शांतीला तत्काळ रूग्णालयात भरती करणे आवश्यक होते. त्याचबरोबर चालत किंवा दुचाकीवरही आणणे अशक्य होते. आरोग्य कर्मचाºयांनी समयसूचकता दाखवत ट्रॅक्टर बोलविली. ट्रॅक्टर गावापर्यंत नेण्यात आली.
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसवून शांतीला आरेवाडा येथे आणले जात होते. मात्र मार्गातच तिची प्रसुती झाली. शांतीने गोंडस बाळाला जन्म दिला. सोबत डॉक्टर व आरोग्य कर्मचारी असल्याने प्रसुतीची प्रक्रिया सुरळीत पार पडली. माता व बालक दोघेही सुखरूप आहेत. दोघांनाही आरेवाडा येथील रूग्णालयात आणण्यात आले.
हे सर्व कार्य तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद मेश्राम यांच्या मार्गदर्शनात आरेवाडा आरोग्य केंद्राचे डॉ. सूचिता दाडगे, परिचारिका भारती, सपना, कुमरे, वाहन चालक पिंटूराज मंडलवार, एमपीडब्ल्यू चिलबुले यांनी पार पाडले. माता व बालकाला सध्या हेमलकसा येथील रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. आरोग्य कर्मचाºयांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे.