कुंभीजवळ उंच पुलाचे बांधकाम करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:18 AM2021-09-02T05:18:13+5:302021-09-02T05:18:13+5:30
गडचिरोली : तालुका मुख्यालयापासून अवघ्या १५ कि. मी. अंतरावर असलेल्या कुंभी गावाजवळील पोटफोडी नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. ...
गडचिरोली : तालुका मुख्यालयापासून अवघ्या १५ कि. मी. अंतरावर असलेल्या कुंभी गावाजवळील पोटफोडी नदीवरील पुलाची उंची अतिशय कमी आहे. पावसाळ्यात या पुलावर पाणी राहत असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. चांदाळा गावापासून अवघ्या तीन कि.मी. अंतरावर कुंभी हे गाव आहे. या गावची लोकसंख्या एक हजारच्या जवळपास आहे. कुंभी गावाला जाताना पोटफोडी नदी पडते. या नदीवर पूल नव्हता, त्यावेळी नागरिक डोंग्याने प्रवास करत होते. त्यामुळे पाईपचा पूल बांधला. मात्र, येथे उंच पुलाची गरज आहे.
तांबाशीतील रस्ता चिखलाने माखला
तळाेधी माे. : नवेगाव (रयतवारी) ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या तांबाशी गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चिखल पसरला आहे. त्यामुळे येथून ये-जा करणे त्रासदायक ठरत आहे. त्यावर स्थानिक प्रशासनाने उपाययाेजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. गावातील प्रमुख रस्ता चिखलमय झाल्याची तक्रार करण्यात आली. परंतु, काहीच कार्यवाही झाली नाही.
*********************************
एका लाईनमनकडे दहापेक्षा अधिक गावांचा प्रभार
एटापल्ली : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषीपंपांना विद्युत पुरवठा करावा लागतो. त्यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते; परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते तसेच एका लाईनमनकडे जवळपास १० गावे येत असल्यामुळे ते प्रत्येक गावी सारखा वेळ देऊ शकत नाहीत. रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाल्यास ताे दुसऱ्या दिवशीशिवाय सुरळीत हाेत नसल्याची गंभीर स्थिती आहे.
उमानूर-मरपल्ली मार्ग दाेन वर्षांपासून अर्धवट
अहेरी : तालुक्यातील उमानूरपासून मरपल्लीपर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काम सुरू करून अर्धवटच सोडण्यात आले. दोन वर्षांचा कालावधी उलटूनही काम न झाल्याने नागरिकांमध्ये राेष आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत उमानूर ते मरपल्लीपर्यंतचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले, तेव्हा रस्त्याच्या बाजूला कामाचे फलकही लावण्यात आले होते. मात्र, ते काम मुरुम व गिट्टी टाकून अर्ध्यावर सोडून देण्यात आले. उमानूर ते मरपल्लीपर्यंत ५ ते ६ किलोमीटर अंतरावर ठिकठिकाणी गिट्टी उखडून असल्याने रहदारीस अडचणी येत आहेत.