सुती कपड्यांची मागणी वाढली
By admin | Published: March 30, 2017 02:05 AM2017-03-30T02:05:14+5:302017-03-30T02:05:14+5:30
यंदा उष्णतेची मोठ्या प्रमाणावर लाट गुढीपाडव्यानंतरच जाणवू लागली आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक सुती कापडांना
उष्णतेची लाट : गडचिरोलीचा पाराही ४० च्यावर
गडचिरोली : यंदा उष्णतेची मोठ्या प्रमाणावर लाट गुढीपाडव्यानंतरच जाणवू लागली आहे. उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक सुती कापडांना पसंती देत असल्याने सुती कापडाची मागणी अचानकपणे वाढली आहे.
यंदा मोठ्या प्रमाणावर उष्णतामान राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनेही याला दुजोरा दिला आहे. येत्या दोन दिवसात गडचिरोली जिल्ह्याच्याही तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या गडचिरोलीचा तापमानाचा पारा ४० ते ४२ डिग्रीच्या जवळ आहे. उष्माघातापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी तहाण लागली नसली तरी मोठ्या प्रमाणावर पाणी प्यावे व शक्यतोवर हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, तसेच गडद व घट्ट व जाड कपडे टाळावे, बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
गडचिरोली शहरात पांढऱ्या रंगाच्या सुती कापडांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शहरातील मोठ्या कापड दुकानांसह खादीच्या प्रदर्शनातही सुती कापड खरेदीसाठी महिला व पुरूष ग्राहक दिसून येत आहे. याशिवाय स्कार्प व पांढरे दुपट्टे याचीही मागणी झपाट्याने वाढली आहे.
गडचिरोली नगर पालिकेतर्फे शहरात दरवर्षी पाणपोई लावल्या जातात. यंदा गुढीपाडवा पार पडल्यानंतरही पाणपोई सुरू झालेल्या नाही. त्यामुळे नागरिक पानठेले व चहा टपऱ्यांवर पाणी पिण्यासाठी जात आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)