बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:25 AM2021-06-17T04:25:15+5:302021-06-17T04:25:15+5:30

आष्टी : दुर्गम भागात बीएसएनएलचे अत्यंत कमी टॉवर आहेत. त्यामुळे या परिसरातील भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ...

Demand for extension of BSNL tower | बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची मागणी

बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची मागणी

Next

आष्टी : दुर्गम भागात बीएसएनएलचे अत्यंत कमी टॉवर आहेत. त्यामुळे या परिसरातील भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक असून, जास्तीत जास्त टॉवर उभारण्याची मागणी होत आहे.

शौचालयांची स्वच्छता करा

देसाईगंज : शासकीय कार्यालयांच्या शौचालयात फार मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. या शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

चामोर्शीत कुशल मजुरांचा तुटवडा

चामोर्शी : विविध कुशल कामे करताना बांधकाम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे. मात्र, कुशल मजुरांची कमतरता आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी कुशल कामगारांचा तुटवडा जाणवतो.

पाणी टाकी परिसरातील सुरक्षा वाऱ्यावर

गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु, या टाकीच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे.

प्राचीन महादेवगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा द्या

आरमोरी : पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आरमोरी येथील प्राचीन महादेवगड आजही उपेक्षितच आहे. राज्य शासन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे; परंतु आरमोरी येथील प्राचीन महादेवगडाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला नाही.

विनापरवानगीने घरांचे बांधकाम

गडचिरोली : शहरात नगर परिषद प्रशासनाची परवानगी न घेताच दरवर्षी शेकडो घरे बांधली जात आहेत. या घरांवर नगर परिषद कोणतीही कारवाई करीत नसल्याने दरवर्षी विनापरवानगीने बांधणाऱ्या घरांची संख्या शहरात वाढत चालली आहे.

सुसाट दुचाकीधारकांवर कारवाई करा

अहेरी : दुचाकीच्या कर्कश आवाजामुळे शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार भरधाव वेगाने वाहन चालवीत असल्याने वाहनांचा कर्कश आवाज ऐकावा लागत आहे.

रुग्णालयासमोरील अतिक्रमण धोकादायक

गडचिरोली : बाल रुग्णालयाच्या संरक्षण भिंतीला लागून दुकाने थाटण्यात आली आहेत. बालक पळवून नेण्यासारख्या अनुचित घटना टाळण्यासाठी अतिक्रमण हटणे आवश्यक आहे. अतिक्रमणामुळे रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णवाहिकांनाही अडथळा निर्माण झाला आहे.

चुरचुरा-पिपरटोला मार्गाची दुरुस्ती करा

गडचिरोली : तालुक्यातील चुरचुरा-पिपरटोला या मार्गाची अनेक दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

राजपूर, बोरी भागात बँक शाखा सुरू करा

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील राजपूर पॅच व बोरी येथील लोकसंख्या पाच ते सहा हजार आहे. श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या वयोवृद्ध नागरिकांची संख्या दीड हजारांच्या आसपास आहे. या वयोवृद्ध नागरिकांना योजनेच्या मानधनाची रक्कम घेण्यासाठी २५ ते ३० किमीचे अंतर गाठून बसथांब्यावर जावे लागते. त्यामुळे राजपूर पॅच व परिसरात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मोहझरीतील मार्गाचे डांबरीकरण करा

आरमोरी : आरमोरी तालुक्यातील मोहझरी या गावातून आरमोरी-मानापूर मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या पोच मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारक कमालीचे त्रस्त आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून राहते. या मार्गावर अपघातांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. मोहझरी येथील अंतर्गत रस्तेसुद्धा उखडले आहेत.

सौरऊर्जेवरील अनेक नळ योजनांना घरघर

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या यांत्रिकी उपविभागाच्या वतीने ज्या गावात विद्युत सुविधा नाही तसेच ग्रामपंचायतीची आर्थिक ऐपत नाही, अशा ग्रा.पं.च्या गावांमध्ये सौरऊर्जेवरील नळ योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, ग्रा.पं.च्या दुर्लक्षितपणामुळे अनेक योजनांमध्ये बिघाड आल्याने त्या बंद आहेत. दुरुस्ती करणारी एजन्सी दुर्गम गावात पोहोचण्यास विलंब होत आहे.

बेलगावात भ्रमणध्वनी मनोरा उभारा

रांगी : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या बेलगाव परिसरात भ्रमणध्वनी कव्हरेज राहत नसल्याने ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे भ्रमणध्वनी मनोरा उभारावा, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. बेलगाव परिसरात बीएसएनएलचे अनेक ग्राहक आहेत.

सोमनूर पर्यटनस्थळ उपेक्षितच

सिरोंचा : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिरोंचा तालुक्यातील सोमनूर संगमाच्या विकासाकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सोमनूर घाटावर गोदावरी, प्राणहिता व इंद्रावती या तीन नद्यांचा संगम आहे. महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी जत्रा भरत असून, हजारो भाविक उपस्थित राहतात. त्रिवेणी संगमावरील दृश्य अतिशय विहंगम असल्याने या ठिकाणी पावसाळा वगळता वर्षभर पर्यटकांची गर्दी राहते. मात्र, या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही.

भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत

सिरोंचा : तालुक्यातील आसरअल्ली परिसरात सात ते आठ गावांचा समावेश आहे. परंतु, या भागातील बीएसएनएल कव्हरेज व इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत असल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. अंकिसा परिसरातील लक्ष्मीदेवीपेठा, बालमुत्त्यमपल्ली, कंबालपेठा, राघवरावनगर, जंगलपल्ली, गेर्रेपल्ली, आदी गावे येतात.

तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात

गडचिरोली : गोकुलनगरलगतच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले होते. मात्र, सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.

औद्योगिक वसाहतीचे काम रखडले

धानोरा : छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या धानोरा तालुका मुख्यालयात औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. मात्र, याबाबत अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे औद्योगिक वसाहतीचे काम थंडबस्त्यात पडले आहे.

अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत

अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयातील अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत आल्या आहेत. तरीही याच इमारतींमधून प्रशासकीय कारभार चालविला जात आहे. मात्र, अद्यापही नवीन इमारत बांधण्यात आलेल्या नाहीत.

पिशव्यांवरील बंदी कागदोपत्रीच

गडचिरोली : शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदीचे आदेश जारी केले आहेत. परंतु, ही बंदी केवळ कागदावरच दिसून येत आहे. ५० मायक्रॉन जाडीपेक्षा कमी व ८ ते १२ इंच उंचीपेक्षा लहान आकाराची प्लास्टिक पिशवी वापरणे व उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. संबंधितांवर कारवाई करावी.

हनुमान मंदिरात सुविधांचा अभाव

आरमोरी : तालुक्याच्या वडधा परिसरातील गणपूर येथील हनुमान मंदिर देवस्थान विकासापासून वंचित आहे. येथील मंदिराचा विकास साधावा, अशी मागणी परिसरातील भाविकांनी केली आहे. वडधापासून तीन किमी अंतरावर असलेल्या गणपूर येथे जंगल परिसरात हनुमान मंदिर वसले आहे. वर्षभर भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. येथे हातपंप नसल्याने भाविकांना विहिरीचे पाणी काढावे लागते. त्याचबरोबर अन्य सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या भागातील भाविकांनी केली आहे.

रोजगारासाठी मजुरांचे छत्तीसगडमध्ये स्थलांतर

गडचिरोली : ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना काम मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर कामासाठी छत्तीसगड व तेलंगणा राज्यांत स्थलांतर करीत आहेत. हे मजूर तेंदुपत्ता तोडण्याचा हंगाम सुरू होईपर्यंत परतणार नाहीत. गोदावरी नदीवर पूल झाल्याने तेलंगणात स्थलांतरित होणाऱ्या मजुरांची संख्या वाढली आहे.

दुर्गम गावांतील रस्ते खड्डेमय

भामरागड : तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावरील लाहेरी गावाकडे येणारा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला आहे. हिंदेवाडा ते लाहेरी या मार्गाची दुरवस्था अनेक दिवसांपासून झाली आहे.

Web Title: Demand for extension of BSNL tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.