सौरऊर्जा पंप बसविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:24 AM2021-06-23T04:24:23+5:302021-06-23T04:24:23+5:30

गडचिराेली : तालुक्यातील काही गावांमध्ये असलेल्या हातपंपांवर सौरऊर्जा पंप बसवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हातपंपावर ...

Demand for installation of solar energy pumps | सौरऊर्जा पंप बसविण्याची मागणी

सौरऊर्जा पंप बसविण्याची मागणी

Next

गडचिराेली : तालुक्यातील काही गावांमध्ये असलेल्या हातपंपांवर सौरऊर्जा पंप बसवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. हातपंपावर सौरऊर्जा संयंत्र बसविल्यास नागरिकांच्या सोयीचे होणार आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांतही सोय होणार आहे. त्यामुळे सौरऊर्जा पंप बसवावा, अशी मागणी आहे.

तलावांच्या सर्वेक्षणाची मागणी

देसाईगंज : जिल्ह्यातील सिंचनाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. अनेक वर्षांपासून मालगुजारी तलावांची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या भरवशावर शेती करावी लागत आहे. कृषी सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेले मामा तलाव केवळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तलावांचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करावी, अशी मागणी आहे.

ई-सेवा साक्षरता प्रशिक्षण शिबिर राबवा

आरमाेरी : आजचे युग हे डिजिटल युग आहे. सर्वच क्षेत्रांत संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र ग्रामीण भागात संगणक प्रशिक्षणसंदर्भात कोणत्याही प्रशिक्षण संस्था नसल्याने अडचण होत आहे. त्यामुळे ई-सेवा साक्षरता प्रशिक्षण शिबिर राबवावे, अशी मागणी होत आहे.

बांधकाम मजूर नोंदणीपासून वंचित

वैरागड : बांधकाम कामगारांची नोंदणी ग्रामपंचायत स्तरावर करण्याचे निर्देश शासनाने दिले असले तरी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे दिसून येत नाही. ग्रामपंचायत प्रशासनाच्या जनजागृतीअभावी मजूर नोंदणीपासून वंचित आहेत. बोगस लाभार्थ्यांची नोंदणी होऊन त्यांना लाभ मिळाला आहे. मात्र काम करणारे लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत.

धूर फवारणी करण्याची मागणी

गडचिराेली : शहरातील काही वाॅर्डांत डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी शहरात जागृती केली जात आहे. शहरातील सर्वच प्रभागांत आरोग्य जागृतीला वेग आला आहे. मात्र, कोरोनासह इतर आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने शहरातील वाॅर्डांमध्ये धूर फवारणी करून डासांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

टोल फ्री क्रमांकाबाबत जनजागृतीचा अभाव

धानोरा : विद्युतपुरवठा खंडित झाल्यास याबाबतची तक्रार करण्यासाठी महावितरण कंपनीने टोल फ्री क्रमांक सुरू केले आहेत. मात्र या टोल फ्री क्रमांकांबद्दल अनेक नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे ते या क्रमांकांवर संपर्क साधू शकत नाहीत. त्याचबरोबर ज्या नागरिकांना हा टोल फ्री क्रमांक माहीत आहे, अशा नागरिकांना प्रतिसाद मिळत नाही.

देऊळगाव येथे जलद बसचा थांबा द्या

आरमोरी : देऊळगाव येथून अनेक विद्यार्थी आरमोरी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. शिवाय सिर्सी, इंजेवारी येथील नागरिकही देऊळगाव बसथांब्यावर येऊन बसची प्रतीक्षा करतात. त्यामुळे देऊळगाव येथे जलद बसचा थांबा देण्यात यावा, अशी मागणी आहे.

तृतीय, चतुर्थ श्रेणीतील भरती करावी

गडचिराेली : कला शाखेतील हजारो विद्यार्थी तृतीय श्रेणीने उत्तीर्ण होतात. या शाखेतील पुढचे शिक्षण घेऊनही नोकरीची हमी नाही. व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केले. शासनाने विविध विभागांतील तृतीय व चतुर्थ श्रेणींच्या नोकरभरतीवर बंदी घातली; तर दुसरीकडे ग्रामीण भागात महाविद्यालयांची संख्या वाढत आहे.

वीजवाहिन्यांजवळील झाडाच्या फांद्या तोडा

चामोर्शी : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये विजेच्या वाहिन्यांलगत मोठमोठी झाडे आहेत. शिवाय फांद्या वाढल्याने त्यांना स्पर्श करीत आहेत. वादळामुळे झाडांच्या फांद्या तारांवर पडल्यास तार तुटून दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे महावितरणने वीजवाहिन्यांलगतच्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

तलावाच्या नहरात झुडपी जंगल

चामाेर्शी : तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार जलाशयामुळे तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना सिंचनाची सोय झाली आहे. मात्र, तलावाच्या नहराची दुरवस्था झाली असून, झुडपे वाढली आहेत. भविष्यात शेतकरी सिंचनापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नहराच्या देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

श्रावणबाळ लाभार्थ्यांना मानधन द्या

अहेरी : जिल्ह्यातील श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी वेतनापासून वंचित असून, त्यांना तातडीने मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. गडचिराेली जिल्ह्यात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेचे मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत; मात्र, त्यांना नियमित मानधन देण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. सातत्याने मागणी करूनही दिरंगाईचा प्रश्न सुटला नाही.

Web Title: Demand for installation of solar energy pumps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.