फेसबुकवरून पैशांची मागणी, आताच व्हा सावध ।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:38 AM2021-05-19T04:38:19+5:302021-05-19T04:38:19+5:30
सध्या लॉकडाऊनमुळे अनेक जणांना काम नसते. विशेषत: युवा वर्गही टाईमपास करण्यासाठी फेसबुकवर बऱ्याच प्रमाणात सक्रिय राहत आहे. यातून मित्र-मैत्रिणी ...
सध्या लॉकडाऊनमुळे अनेक जणांना काम नसते. विशेषत: युवा वर्गही टाईमपास करण्यासाठी फेसबुकवर बऱ्याच प्रमाणात सक्रिय राहत आहे. यातून मित्र-मैत्रिणी वाढविण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. पण हे करताना फ्रेंड रिक्वेस्ट आलेली व्यक्ती कोण आहे याची शहानिशा न करताच अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे बऱ्याच वेळा महागात पडते. त्यामुळे अशा माध्यमाचा वापर कामापुरताच आणि योग्य पद्धतीने करणे जास्त सुरक्षित राहू शकते.
(बॉक्स)
मित्रपरिवारालाच घालतात गंडा
फसवणूक करणारे तुमचे डुप्लिकेट अकाउंट तयार करतात. त्यात तुमच्या फोटोसह तुमची सर्व माहितीही टाकतात. एवढेच नाही तर तुमच्या सर्व फेसबुक मित्रांची यादी मिळवून त्यांना पैशाची अडचण असल्याची पोस्ट टाकून मदतीची मागणी करणारी पोस्ट टाकतात.
- काही लोक ऑनलाईन कर्जपुरवठा, ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून फसवणूक करतात. पैसे भरण्यास सांगतात; पण प्रत्यक्षात तिथे काहीच नसते.
- काही मुली फेसबुकच्या माध्यमातून तुमच्याशी मैत्री करून एखादी अडचण दाखवत पैशाची मागणी करू शकतात; पण पैसे मिळताच त्या गायब होतात.
अशी घ्या काळजी
मित्राच्या नावाने असलेल्या फेसबुक अकाउंटवरून पैशाची मागणी झाल्यास कोणताही विचार न करता दिलेल्या अकाउंटला पैसे टाकू नका. अशावेळी त्या मित्राला फोन करून त्यानेच अशी मागणी केली आहे का, खरोखर तो कोणत्या अडचणीत आहे का याची खात्री करा. यामुळे मित्राच्या नावाने होणाऱ्या आर्थिक फसवणुकीपासून तुम्ही वाचू शकाल.
कोट
सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट शक्यतो स्वीकारू नये. आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नये. समोरची व्यक्ती स्त्री असल्याचे भासवून खोट्या फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून तुमच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न करू शकते; पण वेळीच सावध होऊन सतर्क राहिल्यास पुढील संभाव्य फसगतीपासून तुमचा बचाव होऊ शकतो. - नीलेश ठाकरे,
पोलीस उपनिरीक्षक, सायबर गुन्हे शाखा