आरमोरी नगर परिषदेसाठी लोकसंख्या अहवाल मागितला
By Admin | Published: September 9, 2016 01:13 AM2016-09-09T01:13:00+5:302016-09-09T01:13:00+5:30
आरमोरी येथे नगर परिषदेची निर्मिती करण्यासाठी शासनाने लोकसंख्येचा अहवाल मागितला असून वघाळा
अरसोडा गाव समाविष्ट : नगर परिषद स्थापनेतील अडचण दूर
आरमोरी : आरमोरी येथे नगर परिषदेची निर्मिती करण्यासाठी शासनाने लोकसंख्येचा अहवाल मागितला असून वघाळा व अरसोडावासीयांनी नगर परिषदेमध्ये समाविष्ट होण्यास विरोध दर्शविल्याने त्याऐवजी शेगाव, पालोरा व अरसोडा ही गावे समाविष्ट केली जाणार आहेत.
आरमोरी येथील ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. मात्र आरमोरी शहराची लोकसंख्या २० हजारांच्या जवळपास असल्याने या ठिकाणी नगर परिषद स्थापन करावी, यासाठी काही नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नगर परिषद स्थापन होण्याकरिता २५ हजार लोकसंख्येची अट आहे. आरमोरी शहराची लोकसंख्या २२ हजार ५४६ एवढी आहे. नगर परिषद स्थापनेकरिता आणखी २ हजार ४५४ लोकसंख्येची गरज आहे. त्यामुळे आरमोरी शहराजवळ असलेल्या वघाळा व अरसोडा ही गावे नगर परिषदेमध्ये समाविष्ट करण्याबाबत विचारमंथन सुरू झाले. मात्र या दोन्ही गाववासीयांनी ग्रामसभेत ठराव घेऊन नगर परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नगर परिषद निर्माण होण्यामागील अडचणी आणखी वाढल्या होत्या.
उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना आरमोरी शहराची अधिकृत लोकसंख्या व या नगर परिषद क्षेत्रात आणखी नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांची नावे व एकूण लोकसंख्या सादर करण्याबाबतचे निर्देश दिले होते. अरसोडावासीयांनी आता जरी विरोध दर्शविला असला तरी २००४ साली ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन आरमोरी नगर परिषदेमध्ये समाविष्ट होण्यास सकारात्मकता दर्शविली होती. जिल्हा प्रशासनाने २००४ चा ठराव शासनाकडे सादर केला आहे. अरसोडा गावची लोकसंख्या २ हजार ६०० एवढी आहे. त्याचबरोबर आता नव्या प्रस्तावात शेगाव, पालोरा ही गावे सुद्धा नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत.
अरसोडावासीयांचा नगर परिषदेत समाविष्ट होण्यास विरोध दर्शविला असला तरी शासनाने स्वत:चे अधिकार वापरल्यास सदर गावाला नगर परिषदेमध्ये समाविष्ट व्हावेच लागणार आहे. आरमोरी शहराची कमी असलेली लोकसंख्या हीच महत्त्वाची नगर परिषद स्थापनेमागील अडचण होती. शासनाच्या हस्तक्षेपामुळे ही अट दूर होणार आहे. त्यामुळे आरमोरी येथे नगर परिषद स्थापन होण्यामागील अडथळे दूर होऊन नगर परिषदेची स्थापना होण्याची आशा बळावली आहे. (शहर प्रतिनिधी)