रांगी-मोहली परिसरातील बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:41 AM2021-08-14T04:41:49+5:302021-08-14T04:41:49+5:30
रांगी-मोहली परिसरातील बसफेऱ्या गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत. रांगी परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने मोहली येथे बसने शाळेत ये-जा करतात. ...
रांगी-मोहली परिसरातील बसफेऱ्या गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहेत. रांगी परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने मोहली येथे बसने शाळेत ये-जा करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसअभावी शाळेत ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मोहली येथे मॉडेल स्कूल, मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतून शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. त्यामुळे रांगी आणि परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी दररोज बसने ये-जा करतात. या परिसरात रांगी ते मोहलीकरिता सकाळी तीन आणि सायंकाळी तीन अशा सहा बसफेऱ्या सुरू होत्या. यामध्ये गडचिरोली-खुर्सा-रांगी-मोहली, निमगाव-रांगी-मोहली-धानोरा-गडचिरोली, ब्रह्मपुरी-वैरागड-रांगी- मोहली-धानोरा या बसफेऱ्या याअगोदर नियमित सुरू होत्या. मात्र मागील तीन महिन्यांपासून या बसफेऱ्या बंद आहेत. नुकतेच इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र या मार्गावरील बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी सध्या मिळेल त्याला मदत मागून शाळेत ये-जा करत आहेत. विद्यार्थ्यांना सोय म्हणून मानव विकास मिशन अंतर्गत बस सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र या मार्गावर कोणतीच बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करायला अडचण निर्माण होत आहे. तरी रांगी-मोहली परिसरातील बसफेऱ्या पूर्ववत सुरू करण्याची मागणी पालकांनी केली आहे.