तलावाचे सीमांकन होणार

By admin | Published: May 28, 2016 01:28 AM2016-05-28T01:28:33+5:302016-05-28T01:28:33+5:30

पाटबंधारे (सिंचाई) विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील गोकुलनगर लगतच्या एकमेव तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.

The demarcation of the pond will take place | तलावाचे सीमांकन होणार

तलावाचे सीमांकन होणार

Next

नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश : तीन विभागाच्या संयुक्त पथकाकडून सर्वेक्षणास प्रारंभ
गडचिरोली : पाटबंधारे (सिंचाई) विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या शहरातील गोकुलनगर लगतच्या एकमेव तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनापासून मंत्रालयस्तरापर्यंत तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारीची दखल घेत नवे जिल्हाधिकारी ए. एस .आर . नायक यांनी गडचिरोली तहसीलदारांच्या नावे तत्काळ पत्र काढून यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्याअनुषंगाने गडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर यांनी गुरूवारी तीन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक गठित केले. सदर पथकातील अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी सकाळपासूनच गोकुलनगरच्या तलावात जाऊन अतिक्रमणधारकांचे सर्वेक्षण सुरू केले आहे.
सामाजिक कार्यकर्ते बसंतसिंग बैस यांनी गोकुलनगरलगतच्या तलावाच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी अडचण येत आहे. शिवाय मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. या तलावाच्या पात्रात अनेकांनी पक्की घरे बांधून सरकारी जागा हडपण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे, अशा आशयाची तक्रार नगर पालिका, पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. त्यानंतर मंत्रालयातही या अतिक्रमणाबाबतची तक्रार पोहोचली. या तक्रारीची दखल घेत नवे जिल्हाधिकारी एएसआर नायक यांनी तत्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले. महसूल, पाटबंधारे व नगर परिषद विभागाच्या आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक सर्वेक्षणाच्या कामाला भिडले आहे. गोकुलनगरलगतच्या तलावाचे गडचिरोली व रामपूर या दोन भागात विभाजन आहे. गडचिरोली भागात येणाऱ्या तलावाच्या पात्रात ४७ घरांचे अतिक्रमण आहे. तर रामपूर भागात येणाऱ्या तलावाच्या पात्रात ५० वर अधिक घरांचे अतिक्रमण असल्याची माहिती पथकातील एका तलाठ्यांनी लोकमतला दिली.
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर संयुक्त पथक गडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर यांच्याकडे अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर सदर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. अहवालावर चर्चा झाल्यानंतर भूमीअभिलेख उपअधीक्षक कार्यालयामार्फत या तलावाचे सीमांकन करण्यात येणार आहे. त्यानंतर अतिक्रमणधारकांना प्रशासनाच्या वतीने नोटीस बजाविण्यात येणार आहे. शासनाकडून सुचना मिळाल्यानंतर नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमणाबाबत कारवाईसंदर्भात निर्णय घेत प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे आता प्रथमच कारवाई होईल, अशी आशा शहरवासीयांना आहे. येथील अतिक्रमण हटविल्यास तलावाच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

पावसाळ्यात धोका पोहोचणार
गोकुलनगरलगतच्या तलावाच्या पात्रात अनेक घरे तयार करण्यात आली आहेत. पावसाळ्यात शहरातील नाल्यांद्वारे सांडपाणी व पावसाचे पाणी या तलावात जमा होते, त्यामुळे या तलावातील अनेक घरे पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्याची खबरदारी म्हणून प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. गतवर्षी पावसाळ्यापूर्वी तहसील कार्यालयाच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला. त्यानंतर पालिकेच्या वतीने तलाव पात्रातील अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविण्यात आली होती.

असे झाले सर्वेक्षण
महसूल, पाटबंधारे व नगर परिषदेच्या आठ अधिकारी, कर्मचाऱ्याच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी गोकुलनगरलगतच्या तलावात जाऊन घरांची प्रत्यक्ष पाहणी केली. गडचिरोलीच्या तलाठ्यांकडे या तलावात अतिक्रमण केलेल्या कुटुंबधारकांची यादी आहे. या यादीचे अवलोकन करून अतिक्रमीत घराचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ मोजण्यात आले, शिवाय घराचे बांधकाम सुरू असलेल्या जागेची मोजणी करण्यात आली. तसेच अतिक्रमण घर कोणाच्या नावे, त्यातील सदस्य संख्या किती व तलावाच्या पात्रात अतिक्रमण के व्हापासून आहे, याची माहिती घेण्यात आली.

अतिक्रमणधारक धास्तावले
प्रशासनाच्या वतीने तलावातील अतिक्रमणधारकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आल्यामुळे कारवाईच्या भीतीने येथील अनेक अतिक्रमणधारक धास्तावले आहेत. प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The demarcation of the pond will take place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.