भाऊजी बोरकुटे यांच्या निधनाने सुमधुर भजन थांबले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:34 AM2021-04-12T04:34:43+5:302021-04-12T04:34:43+5:30
शेती व समाजकार्यात रमलेले बोरकुटे काका शासनाच्या एका धोरणात्मक निर्णयामुळे खूप उशिरा शासकीय सेवेत रुजू झाले. मात्र, त्यांच्या अंतर्मनातील ...
शेती व समाजकार्यात रमलेले बोरकुटे काका शासनाच्या एका धोरणात्मक निर्णयामुळे खूप उशिरा शासकीय सेवेत रुजू झाले. मात्र, त्यांच्या अंतर्मनातील भक्तिरसात ओथंबलेले भजन काही थांबले नव्हते. आयुष्यभरात त्यांनी हजारो भजनांना स्वरांचा साज चढविला. हार्मोनियम म्हणजे संवादिनी वाजविण्यात ते तरबेज होते. अनेकांना त्यांनी संगीताचे धडे दिले. कुठलेही शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण न घेता त्यांनी लावलेल्या भजनाच्या सुंदर चाली इल्लूर, आष्टी, अनखोडा, चंदनखेडी, ठाकरी, कुनघाडा परिसरात लोकप्रिय आहेत. लोकगीतांचे त्यांचे आकलनही मोठे वैभवशाली होते. त्यांच्या गळ्यात गोडवा होता. अडल्या-नडल्या कुणाही व्यक्तीचे प्रश्न समजावून योग्य सल्ला देण्यात त्यांना आनंद वाटायचा. ते शासकीय सेवेत रुजू होण्यापूर्वी. दुकानाच्या ओट्यावर बसून त्यांच्यासोबत केलेल्या चर्चांमुळे अनेकांना आकार मिळाला व योग्य दिशा सापडली. दुकान बंद करून शिक्षणासाठी गाव सोडताना त्यांनी विचारलेले थेट प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात आहेत. कारण, बोरकुटे हे शिक्षणप्रेमी होते. स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा स्वभाव होता. मुले खूप शिकावीत अशी त्यांची इच्छा होती. ही इच्छा त्यांचा मुलगा संजय याने पूर्ण केली. अभियांत्रिकी पदवीनंतर नोकरीसाठी संजयचा अमेरिकेपर्यंतचा प्रवास त्यांच्या डोळ्यांदेखत पाहता आला. शिक्षणासाठी पोरांना प्रसंगी शिव्या हासडणारे आणि कुटुंबाच्या गरजा कमी करून शिक्षणाला मदत करणारे बापपण-वडीलपण कुण्या एकट्या संजूसाठी लाभलेले नसतेच. संकट झेलत आणि अनेक अडचणींवर मात करत पुढे जात असल्यातच अनेकांना माेठेपणा वाटताे. बोरकुटे यांचे हे जाण्याचे वय नव्हते. कर्करोगाच्या आजारपणामुळे ते अकाली गेले. आष्टी परिसरात अनेक भजन व संगीतप्रेमींनी बाेरकुटे यांनी श्रद्धांजली वाहिली.
काेट
भाऊजी बाेरकुटे यांच्या अकाली निधनाचा धक्का कुटुंंबासह अनेकांना सहजपणे सहन होणारा नाही. बोरकुटे यांच्यासारख्या स्वच्छ चारित्र्याची व प्रामाणिक माणसाची इल्लूर परिसराला नेहमीच उणीव भासणार आहे. त्यांच्या जाण्यामुळे भजन संगीतात पाेकळी निर्माण झाली आहे.
राजू मडावी, भजनप्रेमी इल्लूर