दारू विक्रेत्यांवरील कारवाईचा डेमो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 05:00 AM2019-12-24T05:00:00+5:302019-12-24T05:00:33+5:30
पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिभना व खरपुंडी गावात जनजागृती केली. एखाद्या गावात दारुविक्रेत्यांवर कारवाई झाल्यास पंच व साक्षीदारांनी काय खबरदारी घ्यावी, हे देखील पथनाट्यातून सोप्या शब्दात या विद्यार्थ्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूविक्री केल्यास कुठली कारवाई होऊ शकते, यासाठी लोकांनी काय करायला हवे, याविषयी पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिभना व खरपुंडी गावात जनजागृती केली. एखाद्या गावात दारुविक्रेत्यांवर कारवाई झाल्यास पंच व साक्षीदारांनी काय खबरदारी घ्यावी, हे देखील पथनाट्यातून सोप्या शब्दात या विद्यार्थ्यांनी सांगितले.
मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून गावातील दारुविक्री बंद करण्यासोबतच अहिंसक कृतीच्या माध्यमातून सातत्याने विक्रेत्यांचे दारूसाठे नष्ट केले जात आहेत. पोलिसांना याची माहिती देत विक्रेत्यांविरोधात तक्रारीही दाखल केल्या जात आहेत. विक्रेत्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी पुरावे ठोस असण्यासोबतच पंचनामा व्यवस्थित होणे आणि पंच व साक्षीदार मजबूत असणेही आवश्यक आहे. अनेकदा गाव संघटनेद्वारे मोठ्या प्रमाणात दारूसाठा पकडूनही पंचनामा नीट न झाल्यास तक्रारी बळकट होत नाही. त्यातच पंच व साक्षीदारांना धमकावण्याचा प्रकारही घडतो. अशा वेळी गावातील नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, साक्षी पुरावे कसे बळकट करावे याविषयी पुण्याच्या विद्यार्थ्यांनी दोन गावांमध्ये पथनाट्य सादर केले. एखाद्या गावात दारू पकडल्यावर आधी पोलिसांना माहिती द्यावी. पोलीस आल्यावर कशा पद्धतीने पंचनामा होतो, प्रत्यक्ष कारवाई करणाऱ्या गावकऱ्यांनी साक्षीदार व पंच होणे का आवश्यक आहे, समन्स येणे, समन्स न आल्यास काय करावे, साक्षीदारांनी ठाम राहणे किती आवश्यक आहे, या सर्व बाबी पथनाट्यातून दाखविण्यात आल्या. गुन्हा सिद्ध झाल्यास विक्रेत्यांना काय शिक्षा होते हे देखील यातून सांगण्यात आले. शिक्षा अनेक विक्रेत्यांवर लगाम घालत असतो. त्यामुळे शिक्षा होणे आवश्यक आहे यावरही जागृती झाली. याप्रसंगी सुमेधा वालदे, प्रथमेश मंडलिक, प्राची दुतोंडे, सोहम जाधव आणि प्रतीक वाकडे यांचा सहभाग होता. मुक्तिपथ चमूतील रेवनाथ मेश्राम, दीक्षा सातपुते, गणेश कोलगिरे यांनी सहकार्य केले.