पालकमंत्र्यांच्या राजवाड्यासमोर निदर्शने
By admin | Published: November 10, 2016 02:22 AM2016-11-10T02:22:41+5:302016-11-10T02:22:41+5:30
आशा वर्कर, गट प्रवर्तक व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन
आयटकचे आंदोलन : मंत्र्यांनी स्वत: येऊन निवेदन स्वीकारले
अहेरी : आशा वर्कर, गट प्रवर्तक व शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आयटक संघटनेच्या वतीने आदिवासी विकास वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अहेरी येथील राजवाड्यावर बुधवारी मोर्चा नेण्यात आला. दरम्यान कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात निदर्शने केली. त्यानंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी स्वत: आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले.
आयटकच्या वतीने आलापल्लीच्या क्रीडा संकूल भवनात शासनाच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरूध्द प्रथम निदर्शने करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या राजवाड्यावर मोर्चा नेण्यात आला. चर्चेदरम्यान पालकमंत्री आत्राम यांनी आयटकच्या पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक संवाद साधून येत्या हिवाळी अधिवेशनात असंघटीत कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन दिले. मोर्चाचे नेतृत्व आयटकचे विनोद झोडगे, देवराव चवळे, अमोल मारकवार, अॅड. जगदिश मेश्राम, शत्रुघ्न अवसरे, वैशाली सोनटक्के यांनी केले. यावेळी जुबेदा शेख, हेमा मोहुर्ले, पार्वती दुर्गे, शेवंता मट्टामी, सविता कन्नाके, पे्रमिला ठाकरे, पोर्णिमा मालाकार, नंदाबाई कोत्तावडला, किशोर मडावी, गीता दासरी, किशोर पेंदाम, सुरेश मडावी, भिमन्ना तालावार, माधुरी कोरटला आदीसह शेकडो कामगार उपस्थित होते. यावेळी असंघटीत कामगारांना दरमहा १८ हजार रूपये वेतन देण्यात यावे, आरोग्य विमा देण्यात यावा, शापोआ कर्मचाऱ्यांना पाच हजार रूपये मानधन देण्यात यावे आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. सदर मोर्चात अहेरी उपविभागातील सर्व शापोआ कर्मचारी, आशावर्कर, गट प्रवर्तक कर्मचारी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)