डेंग्यूने निर्माण केली दहशत
By admin | Published: May 22, 2014 01:05 AM2014-05-22T01:05:14+5:302014-05-22T01:05:14+5:30
मागील वर्षीच्या पावसाळ्यापासून वर्षभरात डेंग्यू आजाराने सहा नागरिकांचा बळी घेतला
गडचिरोली : मागील वर्षीच्या पावसाळ्यापासून वर्षभरात डेंग्यू आजाराने सहा नागरिकांचा बळी घेतला असून डेंग्यूची साथ अजूनही जिल्ह्याच्या काही भागात सुरूच असल्याने नागरिकांमध्ये डेंग्यू आजाराविषयी अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यू आजारापासून सुटका प्राप्त करून घेण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आरोग्य विभाग अपयशी ठरला आहे. डेंग्यू आजार हा डेंग्यू या विषाणुमुळे होतो. डेंग्यू संक्रमणात्मक डासाने चावा घेतल्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर रूग्णाला ताप येणे सुरू होतो. या रोगाची दोन प्रकारे लागन होते. पहिल्या प्रकारात डेंग्यू ताप आणि दुसर्या प्रकारात डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप यांचा समावेश होतो. डेंग्यू रक्तस्त्रावात्मक ताप हा अधिक स्वरूपाचा आजार असून यामुळे रूग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता राहते. तापाबरोबरच डेंग्यू रूग्णाला एकदम जोराचा ताप चढणे, डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे, डोळ्यांच्या मागील भागात वेदना होणे, स्नायू व सांध्यांमध्ये वेदना, छातीवर पुरळ येणे, नाक, तोंड, हिरड्यातून रक्तस्त्राव होणे, रूग्णाला तहान लागणे, तोंड कोरडे पडणे आदी लक्षणे दिसून येतात. जिल्ह्यात यावर्षी डेंग्यू आजाराने चांगलेच थैमान घातले. अगदी मागील वर्षीच्या पावसाळ्यापासून सुरू झालेली डेंग्यूची साथ जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अजूनही अधूनमधून डोके काढत आहे. उन्हाळ्यामध्ये डेंग्यूची साथ राहात नाही, असा सर्वसाधारण अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात होता. मात्र यावर्षी उन्हाळासुद्धा डेंग्यूच्या साथीपासून सुटला नाही. गडचिरोली येथील गोकुळनगर, पुलखल, लक्ष्मणपूर या गावांमध्ये डेंग्यू साथीने अलिकडेच चांगलेच थैमान घातले होते. १५ दिवसांमध्ये तब्बल ४१ डेंग्यूचे संशयीत रूग्ण आढळून आले. यापैकी चार नागरिकांना डेंग्यूची लागन झाली असल्याचे स्पष्ट झाले. वर्षभरात डेंग्यूच्या आजाराने सहा नागरिकांचा मृत्यू झाला. यामध्ये कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथील दोन नागरिक, राजगट्टा चक येथील एक नागरिक व गडचिरोली शहरातील गोकुळनगर येथील तीन नागरिकांचा समावेश आहे. अधूनमधून येत असलेल्या डेंग्यूच्या साथीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये फार मोठी भीती निर्माण झाली आहे. डेंग्यू हा साथीच्या आजारामध्ये मोडणारा आजार आहे. या रोगावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी जिल्हा हिवताप अधिकार्याबरोबरच साथरोग अधिकार्याची सुद्धा आहे. मात्र साथरोग अधिकार्यांकडे आरोग्य विभागातील औषधी भांडार, मानव विकास मिशन अंतर्गत समन्वय ठेवण्याचे काम तसेच जिल्हा प्रशिक्षण पथकाच्या कामाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या खर्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने डेंग्यू रोगाची साथ वाढत चालली आहे. (नगर प्रतिनिधी)