रामपूरमध्ये डेंग्यूचा उद्रेक, ११ रुग्ण आढळले
By संजय तिपाले | Published: May 25, 2024 04:59 PM2024-05-25T16:59:08+5:302024-05-25T16:59:53+5:30
Gadchiroli : मान्सूनपूर्व पावसानेच आरोग्य विभागाचे अपयश चव्हाट्यावर
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायत मधील रामपूर या गावात डेंग्यूचे थैमान सुरु आहे. चार दिवसांत ११ रुग्ण आढळून आल्याने येथे उद्रेक जाहीर केला असून मान्सूनपूर्व पावसानेच डेंग्यूचा कहर सुरु झाल्याने आरोग्य विभागाकडून साथरोग नियंत्रणासाठी राबविलेल्या उपक्रमांचे वास्तव चव्हाट्यावर आले आहे.
रामपूर हे चंद्रपूर सीमेवरील गोंडपिंप्रीजवळील गाव आहे. येथे २२ मे रोजी डेंग्यूचे तीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने आणखी रुग्ण आढळून आले . २५ मे अखेरपर्यंत ११ रुग्ण निष्पन्न झाले आहेत. यातील काही रुग्णांवर आष्टी ग्रामीण रुग्णालय, काहींवर चामोर्शी रुग्णालयात तर काही जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, जिल्ह्यात पर्जन्यमान अधिक असते. त्यामुळे दरवर्षी डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा धोका अधिक बळावतो. जलजन्य आजारांचीही शक्यता असते. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून योग्य त्या उपाययोजना राबविणे अपेक्षित आहे. मात्र, पावसाळा सुरु होण्याआधीच डेंग्यूने डोके वर काढल्याने या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा
रामपूर येथे डेंग्यूचे पहिले तीन रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागाने हलगर्जीपणा केला. मान्सूनपूर्व उपाययोजनाही केल्या नाहीत. पाण्याचे नमुने घेऊन तात्काळ डेंग्यू नियंत्रणासाठी उपाय अपेक्षित असताना असतानाही दुर्लक्ष केले, असा आरोप कढोली ग्रामपंचायतचे सदस्य कृष्णा वाघाडे यांनी केला आहे.
या गावात ११ रुग्ण आढळले आहेत. ५० घरांचे सर्वेक्षण केले आहे. पाणीनमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. आरोग्य विभागाचे एक पथक गावात तैनात केले आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याकडे काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
- डॉ. प्रफुल्ल हुलके, तालुका आरोग्य अधिकारी, चामोर्शी