डेंग्यू प्रतिबंधात्मक जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:23 AM2019-08-09T00:23:11+5:302019-08-09T00:23:29+5:30
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जुलै महिन्यात डेंग्यू प्रतिबंधाविषयी विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्यात आली. जुलै महिन्यात महिनाभर एक दिवस एक कार्यक्रम याद्वारे जनजागृती करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जुलै महिन्यात डेंग्यू प्रतिबंधाविषयी विविध कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्यात आली.
जुलै महिन्यात महिनाभर एक दिवस एक कार्यक्रम याद्वारे जनजागृती करण्यात आली. यामध्ये जलद तापरुग्ण सर्वेक्षण, कोरडा दिवस पाळणे, ग्रामसभेचे आयोजन, डासोत्पत्ती, स्थानांमध्ये गप्पी मासे सोडणे, ग्रामीण आरोग्य, पोषण व स्वच्छता समितीची सभा, डास अळीचे सर्वेक्षण करणे, सर्वच स्तरावर स्वच्छता पाळणे याविषयी जागृती करण्यात आली. निबंध, रांगोळी स्पर्धांचे सुद्धा आयोजन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात मागील वर्षात १८० रक्तजल नमूने तपासले असता, त्यापैकी १३ नमूने दूषित आढळले. यावर्षी जुलै अखेरपर्यंत ३० रक्तजल नमूने तपासण्यात आले. त्यामध्ये एकही नमूना दूषित आढळला नाही. डेंग्यू हा एडीस डासापासून होणारा विषाणूजन्य आजार आहे. तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी आदी गंभीर स्वरूपातील रुग्णास रक्तस्त्राव आदी लक्षणे डेंग्यूची लागण झालेल्या व्यक्तीला आढळून येतात. डेंग्यू रुग्णाचे प्लेटलेट कमी होऊन रक्तस्त्रावामुळे मृत्यू सुद्धा होऊ शकतो. एडीस डासांची उत्पत्ती पाण्याची भांडी, ड्रम, रांजन, टायर यांच्यामध्ये होते. यामुळे घरासभोवताल पाणी साचू देऊ नये, घरांवरील टाक्यांना झाकन बसवावे. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. परिसरातील नाली व डबकी वाहती करावी. मोठ्या डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडावी. तसेच डासोत्पत्तीस्थानाता अळीनाशकाचा वापर करावा, आदीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.