वनविभागाच्या दफ्तरदिरंगाईने लोहखनिज प्रकल्प अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:57 PM2018-06-21T23:57:00+5:302018-06-21T23:57:00+5:30
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या एकमेव लोहखनिज प्रकल्पाचे स्वप्न वनाधिकाºयांच्या आडमुठेपणामुळे भंगणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या एकमेव लोहखनिज प्रकल्पाचे स्वप्न वनाधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे भंगणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खाणीची लिज मिळालेली असताना आणि वनकायद्याच्या सर्व अटींची पूर्तता झालेली असतानाही वनविभागाकडून जमीन ताब्यात देण्यासाठी कानाडोळा केला जात आहे. परिणामी एटापल्ली तालुक्यातील सुरजागडमधील लोहखनिज कसे काढायचे, असा प्रश्न लॉयड्स मेटल्सपुढे निर्माण झाला आहे.
सुरजागड पहाडावरील ३४८ हेक्टर जमीन शासनाने लॉयड्स मेटल्स कंपनीला लिजवर दिली आहे. परंतू या कंपनीला आतापर्यंत पहिल्या टप्प्यात केवळ ४ हेक्टर तर दुसऱ्या टप्प्यात १० हेक्टर अशी केवळ १४ हेक्टर जमीन ताब्यात दिली आहे. आणखी १० हेक्टर जमीन ताब्यात द्यावी यासाठी वर्षभरापासून वनविभागाकडे मागणी केली जात आहे. पण भामरागड वनविभागाच्या उपवनसंरक्षकांकडून या ना त्या कारणांनी टाळाटाळ केली जात आहे. परिणामी सदर कंपनी हा प्रकल्प बंद करण्याच्या मानसिकतेत येऊन पोहोचली आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्वत: येऊन ज्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली त्या प्रकल्पाला शासनानेच अधिकारी वाटाण्याच्या अक्षता लावून जिल्हावासियांचे स्वप्न धुळीस मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात भामरागडचे उपवनसंरक्षक बाला यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
सर्व अडचणी दूर करणार- खारगे
यासंदर्भात राज्याच्या वनविभागाचे प्रधान सचिव तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांना विचारणा केली असता त्यांनी या प्रकाराबद्दल अनभिज्ञ असल्याचे सांगितले. मात्र हा प्रकल्प जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असल्यामुळे वनकायद्याच्या अधीन राहून वनविभागाकडून येणाºया अडचणी दूर केल्या जातील. त्याबाबतची माहिती आजच मुख्य वनसंरक्षकांकडून घेऊन योग्य ते निर्देश दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.