प्रतिनियुक्तीतील शिक्षक जुन्या शाळेवर परतले नाही
By admin | Published: July 2, 2016 01:33 AM2016-07-02T01:33:28+5:302016-07-02T01:33:28+5:30
जिल्हा परिषदेअंतर्गत मागील शैक्षणिक सत्रात प्रतिनियुक्ती दिलेल्या शिक्षकांना ३० एप्रिल नंतर त्यांच्या पूर्वीच्या शाळेत पाठवावे, ....
गडचिरोली : जिल्हा परिषदेअंतर्गत मागील शैक्षणिक सत्रात प्रतिनियुक्ती दिलेल्या शिक्षकांना ३० एप्रिल नंतर त्यांच्या पूर्वीच्या शाळेत पाठवावे, असे निर्देश शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी पंचायत समिती प्रशासनाला दिले होते. मात्र सद्य:स्थितीतही पंचायत समितीमधील शिक्षकांना दिलेल्या तात्पुरत्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्यात आल्या नाही. त्यामुळे हे शिक्षक आपल्या पूर्वीच्या जुन्या शाळेत परतले नाही.
मागील वर्षी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची गरज असलेल्या शाळांमध्ये प्रतिनियुक्त करण्यात आली. तसेच काही शिक्षकांनी सोयीच्या ठिकाणी राहता यावे, यासाठी चिरिमिरी देऊन स्वत:ची प्रतिनियुक्ती करून घेतली. मात्र प्रतिनियुक्ती देण्याचे अधिकार हे विभागीय आयुक्त नागपूर यांना असल्याने सदर शिक्षकांची तात्पुरती प्रतिनियुक्ती ३० एप्रिलनंतर रद्द करणे गरजेचे होते. मात्र चामोर्शी, धानोरा व इतर पंचायत समितीमधील शिक्षकांच्या तात्पुरत्या प्रतिनियुक्त्या अद्यापही रद्द करण्यात आल्या नाही. जि. प. सीईओंनी प्रतिनियुक्त्या रद्द न करणाऱ्या बीओंवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)