सरपंचांच्या हेकेखाेर वृत्तीमुळे नागरिक लाभापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:43 AM2021-09-17T04:43:49+5:302021-09-17T04:43:49+5:30
कोरची तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये कोरोनामुक्त गाव अभियानांतर्गत कोरोनामुक्त झालेल्या पुरुष-स्त्रियांना संसारोपयोगी किट सामाजिक संस्थेमार्फत वाटप करण्यात आल्या; परंतु बेडगाव ...
कोरची तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये कोरोनामुक्त गाव अभियानांतर्गत कोरोनामुक्त झालेल्या पुरुष-स्त्रियांना संसारोपयोगी किट सामाजिक संस्थेमार्फत वाटप करण्यात आल्या; परंतु बेडगाव येथील नागरिकांना या साहित्याचा लाभ मिळाला नाही. किट वाटप करण्याच्या माहितीकरिता आलेल्या सामाजिक संस्थेच्या कर्मचाऱ्यांना मला जिल्हाधिकारी यांचे पत्र दाखवा, नंतर विचार करू असे बोलून परत पाठविले. ही बाब गावकऱ्यांना कळताच लाभ मिळण्यासाठी गावकरी सरपंचांना भेटले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन गावकऱ्यांना परत पाठविले. त्यानंतर गावकरी संस्थेच्या संचालकांना भेटले व लाभ देण्याची विनंती केली; परंतु त्यांनी तुमच्या सरपंचांनी जिल्हाधिकारी यांचे पत्र आणा असे म्हटले व कर्मचाऱ्यांना परत पाठविले. त्यामुळे तुमचे गाव वगळण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर गावकऱ्यांनी सरपंचांना लाभ मिळवून देण्यासाठी सभा घेण्याकरिता पत्र दिले; परंतु सरपंचांनी सभेची तारीख देऊनसुद्धा सभा घेतली नाही, असा आराेप नागरिकांनी केला.
काेट
सामाजिक संस्थेचे कर्मचारी आपल्याकडे आले हाेते. त्यांना याबाबतचे पत्र असल्यास दाखवावे, असे सांगितले. तेव्हा दुसऱ्या दिवशी आणून देताे, असे सांगून ते निघून गेले. परंतु, दुसऱ्या व तिसऱ्याही दिवशी ते परतले नाही. त्यानंतर तालुक्यातील काही ग्रामपंचायतीमध्ये या संस्थेमार्फत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप सुरू झाले. मी त्यांच्याशी संपर्क साधून बाेलावले; परंतु ते आले नाही. बेडगाव येथे सभा घेण्याबाबतही सांगितले हाेते. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. येत्या २२ सप्टेंबरला याबाबत सभा आयाेजित केली आहे. या प्रकरणात विराेधक माझी बदनामी व तक्रारी करीत आहेत.
चेतानंद किरसान, सरपंच बेडगाव