एफडीसीएमच्या कामावरील मजूर हक्काच्या मजुरीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:38 AM2021-07-27T04:38:43+5:302021-07-27T04:38:43+5:30
जंगलात काम केलेल्या मजुरांना त्यांच्या बॅंक खात्यात ऑनलाइन पद्धतीने त्यांची मजुरी जमा करावी, हा शासकीय नियम असतानाही वेलगूर परिक्षेत्रात ...
जंगलात काम केलेल्या मजुरांना त्यांच्या बॅंक खात्यात ऑनलाइन पद्धतीने त्यांची मजुरी जमा करावी, हा शासकीय नियम असतानाही वेलगूर परिक्षेत्रात काम केलेल्या काही मजुरांचे बँक खात्यात पैसे जमा न करता, या परिक्षेत्रातील कर्मचारी आपल्या मनमर्जीनुसार रोखीने मजुरी देण्यासाठी बोटालाचेरू येथे गेले. प्रति घनमीटर शंभर रुपये याप्रमाणे मजुरी घेण्यास मजुरांनी नकार दिला. आम्हाला शासकीय दरानुसार बँक खात्यात मजुरी जमा करा, असे मजुरांनी सांगितले असता, संबंधित कर्मचाऱ्यांनी ठरल्यानुसार मजुरी देऊ जास्तीची मजुरी देण्यास नकार दिला. त्यानंतर, ऋषी सडमेक यांच्या सहकार्याने हरिदास रामा सडमेक, सखाराम येर्रा सडमेक व किशोर मल्ला सडमेक यांनी अहेरी येथे जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन दिले. लगेच जि.प. अध्यक्षांनी संबंधित कर्मचाऱ्याला याबाबत विचारणा केली असता, आम्ही मजुरांना ठरलेल्या दराप्रमानेच मजुरी देऊ, असे सांगितले. तेव्हा जि.प. अध्यक्षांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता, येत्या दोन दिवसांत मजुरांना शासकीय नियमानुसार मजुरी देण्यात येईल, असे सांगितले.
कोट
वनविकास महामंडळाच्या वेलगुर परिक्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांना शासकीय दरानुसार मजुरी न मिळाल्याने, बोटलाचेरू येथील काही मजुरांनी या विषयासंबंधी तक्रारवजा निवेदन दिले आहे. आपण या विषयाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून विचारणा केली आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मजुरांना शासकीय दरानुसार, त्यांच्या बँक खात्यात हक्काची मजुरी न टाकल्यास आंदोलन करू, तसेच मागील तीन वर्षांपासून वेलगूर परिक्षेत्रात झालेल्या सर्व कामाची चौकशी करून, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई व्हावी, यासाठी आपण वनविकास महामंडळाच्या एमडींची नागपूर येथे प्रत्यक्षात भेट घेऊन चर्चा करणार आहोत.
अजय कंकडालवार
जि. प. अध्यक्ष गडचिरोली.
कोट
आपण या विषयाची पूर्ण चौकशी करणार आहोत. जर यात काही अनियमितता आढळल्यास संबंधीत कर्मचाऱ्यांची तक्रार आपण वरिष्ठांकडे करू.
-अमोल केंद्रे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वेलगूर.
260721\1719-img-20210726-wa0028.jpg
एफडीसीएम कामावरील मजुरांची व्यथा, काम करूनही रोजी मिळेना