प्रेमप्रकरणामुळे नक्षली नेत्याची पदावनती
By admin | Published: October 14, 2015 01:57 AM2015-10-14T01:57:39+5:302015-10-14T01:57:39+5:30
एका नक्षली महिला नेत्याशी असलेल्या प्रेमप्रकरणाची वाच्यता झाल्याने ज्येष्ठ माओवादी नेता ...
वाच्यता केली : गजराला अशोकला प्रकरण भोवले
गडचिरोली : एका नक्षली महिला नेत्याशी असलेल्या प्रेमप्रकरणाची वाच्यता झाल्याने ज्येष्ठ माओवादी नेता व दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य गजराला अशोक यास नक्षल्यांच्या कोअर कमिटीने पदावनत केल्याचे वृत्त आहे.
यासंदर्भात छत्तीसगडच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीचा हवाला देत गडचिरोली पोलिसांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. त्यानुसार नक्षल्यांच्या स्पेशल झोनल कमिटीचा सदस्य गजराला अशोक याची पदावनती करून त्याला केवळ विभागीय समितीचा सदस्य बनविण्यात आले आहे. माओवाद्यांची दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी ही दक्षिण छत्तीसगड, तसेच शेजारील तेलंगणा, ओडिसा व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागाला नियंत्रित करीत असते. पोलिसांच्या हाती लागलेल्या दस्तऐवजानुसार, ४२ वर्षीय गजराला अशोक हा बंडखोर होता व नक्षल चळवळीत असलेल्या महिला नेत्यांशी त्याच्या असलेल्या प्रेमसंबंधावरून त्याची पदावनती करण्यात आली आहे. शिवाय विभागीय समिती सदस्य बेज्जारपू किसन व दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य इंगोलापू या दोघांनादेखील प्रेमसंबंधाच्या कारणावरूनच पदावनत करण्यात आले होते, अशी माहिती छत्तीसगडचे पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) दीपांशू काबरा यांनी दिली. चळवळीत प्रेम, लग्न व मुलाचा विचार करावयाचा नाही, असे स्पष्ट निर्देश नक्षल चळवळीत दिले जातात. नक्षल चळवळीमधील अनेक आजारी सदस्यांवर उपचार होत नाहीत, अशी माहिती आत्मसमर्पित नक्षल्यांनी पोलिसांना दिली आहे.
एखादा सदस्य असे कृत्य करीत असल्याचे दिसताच ज्येष्ठ नेते त्यास नसबंदी करावयास सांगतात. चळवळीत कठोर नियम असतानाही प्रेमप्रकरणे पुढे येऊ लागल्याने हा विषय नक्षल चळवळीसाठी चिंतेचा विषय झाला आहे, शिवाय चळवळीला त्याचा फटका बसत आहे, असे पोलिसांना प्राप्त झालेल्या नक्षल्यांच्या कागदपत्रांवरून दिसून येते, असे पोलिसांनी म्हटले आहे.