६१ वर्षांची झाली देसाईगंज नगर परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:40 AM2021-09-06T04:40:32+5:302021-09-06T04:40:32+5:30
देसाईगंज लोकमत न्यूज नेटवर्क : गडचिरोली जिल्ह्यातील पहिली नगर परिषद असलेल्या देसाईगंज नगर परिषदेच्या स्थापनेला आता ६० वर्षे पूर्ण ...
देसाईगंज
लोकमत न्यूज नेटवर्क : गडचिरोली जिल्ह्यातील पहिली नगर परिषद असलेल्या देसाईगंज नगर परिषदेच्या स्थापनेला आता ६० वर्षे पूर्ण झाले आहेत. ही नगर परिषद १९६१मध्ये अस्तित्वात आली. त्यावेळी या पालिकेकडे अवघा आठ हजार रुपयांचा निधी आणि ३१ कर्मचारी होते. आता हा कारभार कोट्यवधींच्या घरात पोहोचला आहे.
पहिल्या वर्षी पालिकेकरिता कर्मचारी मिळणे कठीण होते. परंतु पहिले नगराध्यक्ष पंडित ग्यानचंद शर्मा यांनी हे काम शिताफीने केले. आठ सफाई कामगार, दोन चपराशी व २१ लिपिकांमार्फत पालिकेचा कारभार सुरू झाला. त्यावेळी पालिकेचे वार्षिक उत्पन्न फक्त ९ ते १० हजार रुपये होते. १ मे १९६१ ला चांदा जिल्हा असतांना देसाईगंज नगरपालिकेची स्थापना झाली. १९६१च्या पूर्वी फवारा चौकात स्वतःच्या मालकीची ग्रामपंचायतीची इमारत होती. याच इमारतीत नगरपालिकेचा कारभार सुरू झाला. येथे व्हरांडा व बाजूला थोडीसी मोकळी जागा होती. अशा थोड्याशा लवाजम्यासह नगरपालिकेचा कारभार सुरू झाला. ग्रामपंचायतीचे सरपंच पंडित ग्यानचंद शर्मा हे नगरपालिकेचे पहिले अध्यक्ष झाले. त्यावेळी सदस्यसंख्या फक्त सात होती. १९६१ च्या कालखंडात शिक्षितांची संख्या फार नव्हती. त्यामुळे पालिकेत काम करण्यासाठी कर्मचारी मिळविणेही कसबीचे काम होते. परंतु पंडित ग्यानचंद शर्मा यांच्या वाणीवर प्रभुत्व व त्यांच्या अंगी असलेल्या दातृत्वामुळे काही कर्मचारी मोठ्या कष्टाने तयार झाले. त्यामध्ये नगरपालिकेच्या स्थापनेचे पहिले कर्मचारी म्हणून ज्येष्ठ लिपिक शंकर देशपांडे, कनिष्ठ लिपिक म्हणून गोविंदा बगमारे व सोबतीला आठ सफाई कामगार व दोन चपराशी हाेते. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन हे सदस्य ठरवत असायचे. त्या काळात पालिकेच्या उत्पनांचे प्रमुख स्त्राेत जकात, कांजी हाऊस व शासनाकडून मिळणारे रस्ते दुरुस्ती व पथदिवे खर्च यासाठीचे ९ ते १० हजार रुपये एवढाच निधी प्राप्त व्हायचा. नंतर हळूहळू देसाईगंजचा विस्तार होत गेला. जुनी वडसा, विर्शी तुकुम, नैनपूर आदी भाग वाढायला लागले व तसतसे पालिकेचे कामही वाढत गेले. सर्वच दृष्टिकोनातून मग ही इमारत कमी पडू लागली.
बाॅक्स
अजूनही नाही स्वतःच्या मालकीची जागा
ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीत नगरपालिकेचा तब्बल ३० वर्षे कारभार चालला. कालांतराने ही इमारत जीर्ण व्हायला लागली व काही भाग कोसळायला लागला. नंतर नगरभवन फवारा चौक येथे पालिकेचा संसार थाटण्यात आला. याच कालावधीत पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस प्राथमिक शाळेची इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले होते. सद्य:स्थितीत चालत असलेल्या नगरभवनातून १९९१ला नगरपालिकेचा कारभार या शाळा इमारतीत स्थानांतरित करण्यात आला. आजतागायत याच शाळेच्या इमारतीत नगरपालिकेचा कारभार सुरू आहे. अजूनपर्यंत नगरपालिकेला स्वतःच्या मालकीची स्वतंत्र इमारत मिळाली नाही.