देसाईगंज, गडचिरोली न. प. ची सदस्य संख्या निश्चित
By admin | Published: May 27, 2016 01:24 AM2016-05-27T01:24:20+5:302016-05-27T01:24:20+5:30
राज्य शासनाच्या नगर परिषद विभागाने यंदाच्या अखेरीस निवडणुका होणाऱ्या नगर परिषदांची सदस्यसंख्या निश्चित केली आहे.
गडचिरोली : राज्य शासनाच्या नगर परिषद विभागाने यंदाच्या अखेरीस निवडणुका होणाऱ्या नगर परिषदांची सदस्यसंख्या निश्चित केली आहे. गडचिरोली नगर परिषदेची सदस्यसंख्या दोनने वाढली असून, आता ती २५ झाली आहे. देसाईगंज नगरपरिषदेची सदस्यसंख्या एकने वाढली असून, आता तेथे १८ नगरसेवक असणार आहेत.
महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ९(२) मधील तरतुदीस अनुसरुन २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेऊन (एससी, एसटी व ओबीसी लोकसंख्येसह) गडचिरोली व देसाईगंज नगरपरिषद क्षेत्रांची सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली आहे. सध्या गडचिरोली नगरपरिषदेत २३ नगरसेवक आहेत. आता त्यात दोनने वाढ होऊन २५ नगरसेवक असणार आहेत. देसाईगंज नगरपरिषदेत सध्या १७ नगरसेवक आहेत. त्यात एकने वाढ झाली असून, आता तेथे १८ नगरसेवक होतील.
याबरोबरच स्त्री सदस्य तसेच अनुसूचित जाती, जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गांची आरक्षित सदस्य संख्याही निश्चित करण्यात आली आहे. नव्या रचनेनुसार, 'ब' वर्गात मोडणाऱ्या गडचिरोली नगर परिषदेच्या २५ नगरसेवकांपैकी १३ जागा स्त्रियांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी ४ जागा व नागरिकांच्या मागास प्रवगार्साठी ७ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. स्त्रियांसाठी राखीव असलेल्या १३ जागांपैकी प्रत्येकी २ जागा अनुसूचित जाती जमातीच्या स्त्रियांसाठी, ४ जागा नागरिकांच्या मागास प्रवगार्तील स्त्रियांसाठी, तर ५ जागा सर्वसाधारण प्रवगार्तील स्त्रियांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. 'क' वर्गात मोडणाऱ्या देसाईगंज नगर परिषदेच्या १८ नगरसेवकांपैकी ९ जागा स्त्रियांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी ३ जागा, अनुसूचित जमातीसाठी १ जागा व नागरिकांच्या मागास प्रवगार्साठी ५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. स्त्रियांसाठी राखीव असलेल्या ९ जागांपैकी २ जागा अनुसूचित जातीच्या स्त्रियांसाठी, ३ जागा नागरिकांच्या मागास प्रवगार्तील स्त्रियांसाठी, तर ४ जागा सर्वसाधारण प्रवगार्तील स्त्रियांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.