धमदीटोलावासीयांची पाण्यासाठी वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:33 AM2018-04-19T01:33:15+5:302018-04-19T01:33:15+5:30

कुरखेडा तालुक्यातील नान्ही गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या धमदीटोला (मंदिरटोला) येथील पाण्याचे सर्वच स्रोत आटले असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना शेतातील विहिरीचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे.

Descriptive water distribution | धमदीटोलावासीयांची पाण्यासाठी वणवण

धमदीटोलावासीयांची पाण्यासाठी वणवण

googlenewsNext
ठळक मुद्देपाण्याचे सर्वच स्रोत आटले : शेतातील विहिरीचे आणावे लागते पाणी; हातपंप खोदण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील नान्ही गटग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या धमदीटोला (मंदिरटोला) येथील पाण्याचे सर्वच स्रोत आटले असल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावकऱ्यांना शेतातील विहिरीचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे.
धमदीटोला हे गाव जवळपास ३०० लोकवस्तीचे आहे. गावाच्या मध्यभागी एकमेव सार्वजनिक विहीर आहे. गावाच्या दोन्ही टोकावर हातपंप आहेत. मात्र मागील १५ दिवसांपासून सार्वजनिक विहीर पूर्णपणे कोरडी पडली आहे. त्याचबरोबर दोन्ही हातपंपांना अत्यल्प व गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावाच्या जवळच शेतात विहीर आहे. या विहिरीतून बैलबंडी व ड्रमद्वारे पाणी आणून दैनंदिन गरज भागवावी लागत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. उन्हाळा संपण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. संपूर्ण गाव आता शेतातील विहिरीचे पाणी आणत आहे. त्यामुळे सदर विहीर सुद्धा आटण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर विहीर आटल्यास या गावातील नागरिकांना दुसºया गावावरून पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही.
गावातील पाणीटंचाईची माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे यांना देण्यात आली. त्यांनी व पं.स. सदस्य गिरीधर तितराम यांनी धमदीटोला गावाला मंगळवारी भेट दिली. गावातील पाणीटंचाई लक्षात घेऊन कायमस्वरूपी पाणीटंचाई सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश ग्रामसेवक कोहळे यांना दिले. त्याचबरोबर कुरखेडा येथील संवर्ग विकास अधिकारी मरस्कोल्हे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कटरे यांच्याशी चर्चा करून गावातील पाणीटंचाई त्यांच्या लक्षात आणून दिली.
एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर या गावात दरवर्षीच पाणीटंचाईची समस्या तीव्र होते. पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी गावातील नागरिकांनी अनेकवेळा जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला आहे. मात्र जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केले. गावाची लोकसंख्या ३०० एवढी असतानाही गावात फक्त एक सार्वजनिक विहीर व दोेनच हातपंप आहेत. पाणीटंचाईवर आळा घालण्यासाठी या गावात पुन्हा हातपंप खोदणे आवश्यक असल्याची बाब गावकऱ्यांनी पदाधिकाºयांच्या लक्षात आणून दिली.
जिल्हा परिषद सदस्यांनी उपलब्ध करून दिला टॅक्टर
धमदीटोला येथे पाणीटंचाईची समस्या गंभीर झाली असल्याची बाब गावकºयांनी जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्यांनी स्वत:कडून पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. गावकऱ्यांशी पाणीटंचाईबाबत जि.प. सदस्य कराडे व पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम यांनी चर्चा केली. गावात हातपंप खोदून देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन कराडे यांनी गावातील नागरिकांना दिले.
गावातील पाणीपुरवठा योजनेबाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता कटरे यांना विचारले असता, पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार झाला आहे. सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल, अशी माहिती दिली.
धमदीटोला गावात शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाकडे पाळीव जनावरे आहेत. गावातील पाण्याचे स्त्रोत आटण्याबरोबरच सभोवतालचेही पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी जनावरांची सुद्धा भटकंती होणार आहे. बाहेर पाणी मिळत नाही. त्यामुळे जनावरे घरी येतात. मात्र घरी सुद्धा पाणी मिळत नसल्याने जनावरांनाही पाणीटंचाईची झळ बसणार आहे.
उन्हाळा संपण्यास आणखी दोन महिने शिल्लक आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दोन महिन्यात पाणी समस्या आणखी गंभीर होणार आहे.

Web Title: Descriptive water distribution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.