देसाईगंज व कोरचीत वाहतुकीची कोंडी
By admin | Published: January 9, 2017 12:51 AM2017-01-09T00:51:16+5:302017-01-09T00:51:16+5:30
रस्त्याच्या बाजुला झालेल्या अतिक्रमणामुळे कोरची व देसाईगंज येथे वाहतुकीच्या कोंडीची समस्या प्रचंड गंभीर झाली आहे.
अपघात वाढले : अतिक्रमणामुळे निर्माण झाली समस्या, कोरचीवासीयांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
देसाईगंज/कोरची : रस्त्याच्या बाजुला झालेल्या अतिक्रमणामुळे कोरची व देसाईगंज येथे वाहतुकीच्या कोंडीची समस्या प्रचंड गंभीर झाली आहे. याकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे.
कोरची येथील नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन रस्त्याच्या बाजुचे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरची हे १३३ गावांचे संपर्क ठिकाण असल्याने या ठिकाणी वाहने व नागरिकांचे नेहमीच वर्दळ राहते. आठवडी बाजाराच्या दिवशी मुख्य मार्गावरून वाहन घेऊन जाणे कठीण होते. कोरची ग्रामपंचायत असताना नगरातील प्रमुख रस्ते रूंदीकरणाकरिता जिल्हा परिषद बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्वांनी मिळून अतिक्रमणधारकांना रस्त्याच्या मुख्य केंद्रापासून १२ मीटरपर्यंतचे अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस दिले होते. मात्र संधीसाधू लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला होता. १० वर्षा अगोदर अतिक्रमण हटविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. मात्र त्याचेही काहीच झाले नाही. कोरची येथील रस्ते अतिक्रमणामुळे अरूंद झाले आहेत. कोरची येथे ब्रह्मपुरी, गडचिरोली, साकोली व गोंदिया आगाराच्या बसेस येतात. त्यामुळे दळणवळणाचा प्रश्न गंभीर होत आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करावे, अशी मागणी कोरची शहरातील नागरिकांकडून करण्यात येत असली तरी याकडे नगर पंचायत तसेच बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष होत आहे.
देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील व्यापारी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. विविध वस्तू खरेदीसाठी जिल्हाभरातील नागरिक देसाईगंज येथे येतात. त्यामुळे बाजारपेठ, मुख्य मार्गावर चारचाकी वाहने व दुचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. मात्र देसाईगंजातही अतिक्रमणाची समस्या गंभीर बनत चालली आहे. शहरातून मुख्य मार्गाने रस्ता दुभाजक नाही. त्यामुळेही वाहनांवर नियंत्रण राहत नाही. कधीकधी चार ते पाच वाहने एकाच वेळेवर आल्याने वाहतुकीची कोंडी होते. बसस्थानकासमोर वर्षभर गर्दी राहते. स्वतंत्र बसस्थानक नसल्याने जिल्हाभरातून येणाऱ्या बसेस बसस्थानकाच्या समोरच उभ्या केल्या जातात. त्यामुळे अतिक्रमण हटविण्याची मागणी आहे.
कोरचीत इतरही समस्या कायम
ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर झाले असले तरी शहराच्या विकासावर कोणताही परिणाम झाला नाही. शहराच्या विकासासाठी आठवडी बाजाराचे स्थानांतरण करावे, कचऱ्याचा स्वतंत्र डम्पिंग ग्राऊंड तयार करावा, सर्वच वार्डांमध्ये सीमेंट रस्ते, नाली बांधकाम व मोरी बांधकाम करावे, क्रीडा संकुलाचे बांधकाम करून नवीन बगिचा बांधण्यात यावा, तलावाची दुरूस्ती करून सौंदर्यीकरण करावे, कोरची येथील गरजू व्यक्तींना घरकुलाचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी कोरची येथील हिरालाल पांडुरंग राऊत, परदेशी बगवा, प्रियतमा खुशाल जेंगठे यांनी केले आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.