रेतीघाट बंद असतानाही कंत्राटाची बांधकामे जोरात सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 01:09 AM2019-02-09T01:09:30+5:302019-02-09T01:09:50+5:30
जिल्हाभरातील रेती घाट बंद असताना शासकीय कामे कंत्राटदारांकडून कशी काय सुरू आहेत, या बांधकामांना रेती कुठून येत आहे. बिलासोबत जोडावयाची रेतीची टीपी कोणती जोडली जाणार आहे. याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
अरूण राजगिरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव/चोप : जिल्हाभरातील रेती घाट बंद असताना शासकीय कामे कंत्राटदारांकडून कशी काय सुरू आहेत, या बांधकामांना रेती कुठून येत आहे. बिलासोबत जोडावयाची रेतीची टीपी कोणती जोडली जाणार आहे. याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
घोडाझरी सिंचन विभागांतर्गत येत असलेल्या चोप येथील पाटलीन तलावाचे कोट्यवधीचे काम सुरू आहे. एकाही ट्रिपची रॉयल्टी न काढता अवैधपणे रेतीची वाहतूक सुरू आहे. सर्रासपणे वाळूचा गोरखधंदा सुरू झाला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांचा वापर करून रात्री रेतीची चोरी केली जात आहे. रेतीची चोरी झाल्यास ट्रॅक्टर मालकावर एक लाख रूपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे. संबंधित कर्मचाºयांना थोडी चिरीमिरी देऊन कमी पैशात ट्रॅक्टर सोडली जात आहे. त्यामुळे रेती वाहतूकदारांची हिंमत वाढत चालली आहे. अनेकांना घरकूल मंजूर झाले आहेत. मात्र रेती मिळत नसल्याने गरीबांच्या घराच्या कामाला अजूनपर्यंत सुरूवात झाली नाही. मात्र शासकीय कामे बिनधास्तपणे सुरू आहेत. शासकीय कामासाठीच रेतीची तस्करी होत असताना शासकीय अधिकारी मात्र मूग गिळून आहेत. त्यांचे हात बांधले असावे, त्यामुळे ते चुपी साधून आहेत, असा आरोप होत आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
रेती घाटांचा प्रस्ताव शासन दरबारीच पडून
गडचिरोली : रेती घाटांना परवानगी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने रेती घाटांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र अजूनपर्यंत या प्रस्तावावर निर्णय झाला नाही. इतर जिल्ह्यांच्या प्रस्तावांना मान्यता देणे सुरू झाले आहे. त्यामुळे एकदोन दिवसात मान्यता मिळेल, अशी माहिती अधिकाºयांनी दिली. गडचिरोली शहरातही मोठ्या प्रमाणात नाली, रस्ता व इतर बांधकाम सुरू आहेत. चोरीची रेती अतिशय निकृष्ठ दर्जाची असतानाही बांधकाम केले जात असल्याचे दिसून येत आहे.