लाखोंच्या खर्चानंतरही कचऱ्याचे ढिगारे कायम

By admin | Published: July 9, 2016 01:35 AM2016-07-09T01:35:50+5:302016-07-09T01:35:50+5:30

स्थानिक ग्रामपंचायतीने पाणी स्वच्छता यावर २०१५-१६ या वर्षात लाखो रूपये खर्च केले आहेत. तरीही गावातील अंतर्गत तसेच बाहेरील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग कायम आहेत.

Despite the cost of millions, the garbage debris continued | लाखोंच्या खर्चानंतरही कचऱ्याचे ढिगारे कायम

लाखोंच्या खर्चानंतरही कचऱ्याचे ढिगारे कायम

Next

वैरागडातील विदारक वास्तव : स्वच्छता अभियानाची ऐशीतैसी; डॉक्टरांच्या निवासस्थानासमोर घाण
वैरागड : स्थानिक ग्रामपंचायतीने पाणी स्वच्छता यावर २०१५-१६ या वर्षात लाखो रूपये खर्च केले आहेत. तरीही गावातील अंतर्गत तसेच बाहेरील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग कायम आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोरून जाणाऱ्या जोगीसाखरा मार्गावर वैद्यकीय अधिकारी डॉ. वाघधरे यांच्या निवासस्थानालगत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत.
१३ मे रोजी झालेल्या वार्षिक सभेत गावातील पाणी व्यवस्थेवर आणि गावातील स्वच्छतेवर मोठा खर्च दाखविण्यात आला आहे. मात्र त्या प्रमाणात गावकऱ्यांना सोयीसुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. मागील चार दिवसांपूर्वी भर पावसाळ्यात येथील नळ योजना बंद राहिल्याने गावकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. नळ योजनेला फिल्टरची व्यवस्था नसल्याने नळाला गढूळ पाणी येते. परिणामी आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावाअंतर्गत नाल्यांचा उपसा करण्यात आला. या व्यतिरिक्त स्वच्छतेचे दुसरे काम ग्रामपंचायतीने केले नाही.
जोगीसाखरा मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या रस्त्याच्या बाजुला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला आहे. पावसाळ्यादरम्यान सदर कचरा कुजून या कचऱ्याची दुर्गंधी प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय अधिकारी यांचे निवासस्थान व परिसरात पसरत आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. (वार्ताहर)

प्रतिबंध आवश्यक
रस्त्याच्या बाजुला आणून कचरा टाकला जात आहे. याचा त्रास सभोवतालच्या नागरिकांना होत असल्याने ग्रामपंचायतीने सर्वप्रथम या कचऱ्याची उचल करावी, त्यानंतर या ठिकाणी कचरा टाकण्यास प्रतिबंध घालावा, जो नागरिक या ठिकाणी कचरा टाकेल, त्याच्यावर दंडात्मक कारवाईचीसुद्धा तरतूद करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Despite the cost of millions, the garbage debris continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.