एफडीसीएम रोपवनातील झाडे नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 10:29 PM2018-04-12T22:29:45+5:302018-04-12T22:29:45+5:30
कुरखेडा तालुक्यातील शिरपूर कक्ष क्रमांक ७९ व ८३ (अ) मधील घनदाट जंगल तोडून त्या ठिकाणी सागाचे रोपवन लावले. परंतु त्यातील बहुतेक रोपटे नष्ट झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : कुरखेडा तालुक्यातील शिरपूर कक्ष क्रमांक ७९ व ८३ (अ) मधील घनदाट जंगल तोडून त्या ठिकाणी सागाचे रोपवन लावले. परंतु त्यातील बहुतेक रोपटे नष्ट झाली आहेत.
पेसा क्षेत्रांतर्गत येणारे वनक्षेत्र ग्राम समित्यांच्या संमतीशिवाय वने, वन्यजीव आणि जैव विविधतेची कोणतीही हानी करता येणार नाही, असे नियमात असताना वनाधिकार कायद्याचे उल्लंघन करून एफडीसीएमने मोठ्या प्रमाणात जंगलाची हानी केली. एफडीसीएमने घनदाट जंगलातील लहान-मोठी झाडे तोडून जंगल सपाट केल्याने सर्वत्र ओसाड माळरान दिसून येते. विशेष म्हणजे, परिसरातील जंगलातून प्राप्त वनोपजावर येथील लोकांची उपजिविका अवलंबून होती. त्यांना गौण वनोपज मिळत होते. त्यामुळे शिरपूर, भगवानपूर, चिखली, सावलखेडा, सालमारा येथील नागरिकांनी एफडीसीएमविरोधात एल्गार पुकारून वृक्षतोड बंद पाडली होती. गाव समित्या व एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांची उपवनसंरक्षक कार्यालय वडसा येथे संयुक्त बैठक झाली. या बैठकीत एफडीसीएमचे विभागीय व्यवस्थापक राजपूत यांनी गाव समित्यांची दिशाभूल करणारी माहिती दिली. ज्या जंगलात एफडीसीएमने वृक्षतोड केली. ते जंगल कोणत्याही गावाच्या सीमेत येत नाही. पण जिल्ह्यात वन सीमांचे निर्धारण नाही असे जंगल नाही. परंतु एफडीसीएमने वन विभागाशी संगनमत करून अधिक घनता असलेले जंगल हस्तांतरित करून जंगलाची फार मोठी हानी केली. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. वयस्क व वठलेले वृक्ष तोडणे आवश्यक असतानाही एफडीसीएफमार्फत सरसकट जंगलाची तोड केली जात आहे. त्यामुळे मौल्यवान वनसंपदा नष्ट होत आहे. स्थानिक नागरिकांकडून या वृक्षतोडीला विरोध असतानाही या विरोधाला न जुमानता एफडीसीएमने वृक्षतोडीची कार्यवाही करीत आहे. मागील वर्षी वैरागड येथील नागरिकांनी एफडीसीएमच्या वृक्षतोडीला विरोध केला होता. तसेच देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव परिसरात नागरिकांनी विरोध दर्शविला होता.
एफडीसीएम नागरिकांची दिशाभूल करीत असून गाव हद्दीबाहेर जंगल अशी वन विभागात परिभाषा नाही. पेसा क्षेत्रात अशा शब्दाचा उल्लेखनही नाही. एफडीसीएमला ज्या वनाधिकाºयांनी हे जंगल हस्तांतरित केले त्या वनाधिकाºयांवर कारवाई करावी.
- केशव गुरनुले, संचालक, सृष्टी निसर्ग संस्था शंकरपूर