गुळाचा सडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 01:41 AM2019-02-13T01:41:01+5:302019-02-13T01:41:35+5:30
तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या चिंतरवेलालगतच्या नदीकिनारी आसरअली पोलिसांनी मंगळवारी धाड टाकून जंगलात लपविलेला गुळाचा १५ ड्रम सडवा नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरात येणाऱ्या साहित्याची होळी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुका मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या चिंतरवेलालगतच्या नदीकिनारी आसरअली पोलिसांनी मंगळवारी धाड टाकून जंगलात लपविलेला गुळाचा १५ ड्रम सडवा नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरात येणाऱ्या साहित्याची होळी केली. परंतु तत्पूर्वी पोलिसांची चाहूल लागताच दारू गाळणाºया इसमांनी घटनास्थळावरून पळ काढला.
सिरोचा तालुक्यातील दुर्गम व नदीला लागून असलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात दारू गाळून विक्री केली जाते. आसरअल्ली परिसरातील चिंतरवेला या गावात मोठ्या प्रमाणात गावठी दारू विकली जाते. मुक्तिपथद्वारे या गावात संघटन तयार करण्याचे वारंवार प्रयत्न केले जात आहेत. पण गावकरी याला दाद देत नसून दारूची मोठ्या प्रमाणात विक्री करतात. यात महिलांचाही मोठा सहभाग आहे. चिंतरवेला येथे दारूची विक्री होत असल्यामुळे जवळच्या पेंटीपाका, तुमनूर, आरडा या गावातील अनेक नागरिक दारू पितात. त्यामुळे या गावातील महिला त्रस्त आहेत. काही सुज्ञ नागरिकांकडून वारंवार येथील दारूविक्री बंद करण्याची मागणी करण्यात आली. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच झाले. परिसरातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी मुक्तिपथ चमूने पोलिसांशी चर्चा केली. त्यानुसार मंगळवारी आसरअल्ली पोलीस ठाण्याचे निरीक्षक दराडे यांच्या नेतृत्त्वात पोलिसांनी सापळा रचून चिंतरवेला येथील नदीलगतच्या परिसरात धाड टाकून परिसर पिंजून काढला. पोलिसांची चाहूल लागताच अवैध दारू काढणाºयांनी पळ काढला. यावेळी त्यांना १५ ड्रम गूळ सडवा आणि दारूच्या हातभट्ट्या आढळून आल्या. पोलिसांनी सर्व सडवा व साहित्य जागीच नष्ट केले. या भागात यापुढे धडक कारवाई करून अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.