चार ड्रम माेहफूल सडव्यासह ५० लिटर दारु केली नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:42 AM2021-03-01T04:42:53+5:302021-03-01T04:42:53+5:30
दारूसह पकडलेल्या आराेपीचे नाव उद्धव मानकर रा. वैरागड असे आहे. विशेष म्हणजे, वैरागड परिसरात आठवड्याभरात केलेली ही तिसरी कारवाई ...
दारूसह पकडलेल्या आराेपीचे नाव उद्धव मानकर रा. वैरागड असे आहे. विशेष म्हणजे, वैरागड परिसरात आठवड्याभरात केलेली ही तिसरी कारवाई आहे. वैरागडजवळून खाेब्रागडी, वैलाेचना नदी वाहते. नदीकाठालगत झाडे व झुडपी वेढली आहेत. याचा फायदा घेऊन अनेक दारू विक्रेते नदी किनारी दारूभट्ट्या लावून दारू गाळतात. या विक्रेत्यांच्या माध्यमातून दारूविक्री बंद असलेल्या गावातील मद्यपींना सहजतेने दारू उपलब्ध होते. सोबतच सभोवतालच्या गावात देखील दारू पुरविली जाते. वैरागड येथील नदीकाठालगत दारू गाळली जात असल्याची माहिती मिळताच आरमोरी पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्त कृती करण्याचे ठरविले. त्यानुसार नदी परिसरात शोधमोहिम राबविली. दरम्यान एका ठिकाणी चार ड्रम मोहसडवा व ५० लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. घटनास्थळावरुन जप्त केलेला माल जागीच नष्ट करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. अहिंसक कृतीत पोलीस कर्मचारी सचिन वासेकर, वासुदेव ढोरे, मुक्तिपथ तालुका संघटक नीलम हरिणखेडे, उपसंघटक प्रकाश कुनघाडकर सहभागी झाले होते.
बाॅक्स
रात्रीच्या सुमारास पुरवठा
वैरागड नदी व जंगल परिसरात हातभट्ट्यांवर दारू गाळून रात्रीच्या सुमारास परिसरातील गावांमध्ये पुरवठा केला जाताे. या माध्यमातून अनेक गावातून दारूविक्री केली जाते. ज्या गावांमध्ये दारूबंदी आहे अशा गावांमध्येसुद्धा दारूविक्री केली जात आहे.त्यामुळे व्यसनमुक्त झालेले अनेकजण पुन्हा दारूच्या आहारी जाण्याची शक्यता आहे.