कोट्यवधी रुपयांच्या धानाची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 05:00 AM2021-05-28T05:00:00+5:302021-05-28T05:00:32+5:30
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात धान व मका उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून धान खरेदी केंद्रावर आ. डॉ. देवराव होळी यांनी पाहणी केली असता तेथील अत्यंत धक्कादायक परिस्थिती समोर आली. मागील वर्षीपासून या केंद्रावरील उघड्यावर असलेल्या धानाची उचल न केल्यामुळे येथील कोट्यवधी रुपयांचे धान सडल्याचे निदर्शनास आले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामाेर्शी तालुक्यातील अड्याळ येथे आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने धान खरेदी करण्यात आले; परंतु येथील धान खरेदी केंद्रावरील धानाची उचल मागील वर्षीपासून न झाल्याने कोट्यवधी रुपयांचे धान सडले आहे. या धानाच्या नासाडीला सर्वस्वी जबाबदार संबंधित अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना जबाबदार धरून निलंबित करावे, अशी मागणी आ. डाॅ. देवराव हाेळी यांनी केली आहे.
आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात धान व मका उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून धान खरेदी केंद्रावर आ. डॉ. देवराव होळी यांनी पाहणी केली असता तेथील अत्यंत धक्कादायक परिस्थिती समोर आली. मागील वर्षीपासून या केंद्रावरील उघड्यावर असलेल्या धानाची उचल न केल्यामुळे येथील कोट्यवधी रुपयांचे धान सडल्याचे निदर्शनास आले. दरवर्षी अशा प्रकारे जाणीवपूर्वक कोट्यवधी रुपयांच्या धानाची नासाडी करण्यात येत असल्याने खरेदी केंद्रावरील धानाच्या नासाडीला आर.एम. व एस.आर.एम.आर. हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करावे व येथील धानाची तातडीने उचल करावी तसेच मका व धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी आ. होळी यांनी केली.
चामाेर्शी तालुक्यात मागील ५ वर्षांत धान, मका व भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. सिंचनाची साेय झाल्यानंतर प्रत्येक शेतकरी उन्हाळी पिकांची लागवड करताे; परंतु त्याच्या मालाला भाव मिळत नसल्याने काहीसा हिरमाेड हाेत आहे. काही दिवसातच खरीप हंगामाला सुरूवात हाेणार असल्याने आता पैशांची आवश्यकता आहे.
मका उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त
मागील वर्षीपासून जिल्ह्यात आधारभूत मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात मका लागवड क्षेत्रात माेठ्या प्रमाणात वाढ झाली. याही वर्षी आधारभूत किमतीत मका खरेदी केंद्र सुरू हाेईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना हाेती; परंतु तसे झाले नाही. १ मेपासून आधारभूत मका व रबी धान खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक हाेते; परंतु अद्यापही धान व मका खरेदी केंद्र सुरू न झाल्याने मका उत्पादक शेतकरी चिंतीत आहेत.