वैरागडातील ऐतिहासिक वास्तू नष्ट हाेण्याचा धाेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:36 AM2021-03-21T04:36:08+5:302021-03-21T04:36:08+5:30
वैरागड : येथून १५ किमी अंतरावर असलेल्या वैरागड येथे ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वर, गोरजाई मंदिर, आदिशक्ती माता व हेमाडपंती मंदिरे ...
वैरागड : येथून १५ किमी अंतरावर असलेल्या वैरागड येथे ऐतिहासिक किल्ला, भंडारेश्वर, गोरजाई मंदिर, आदिशक्ती माता व हेमाडपंती मंदिरे आहेत. मात्र या मंदिरांच्या डागडुजीकडे पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केल्याने ही मंदिरे शेवटच्या घटका मोजत आहेत.
वैरागड येथील लाखमोलाच्या स्थळांची दुर्दशा मन खिन्न करणारी आहे. गावाच्या पूर्वेला वैलोचना नदीच्या तीरावर गोरजाई मंदिर आहे. मागील १० वर्षांपासून माना समाजबांधव डिसेंबर महिन्यात या ठिकाणी यात्रा भरवितात. शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेल्या या मंदिराची भग्न अवस्था झाली आहे. मंदिराच्या घुमटाची गोरजाई देवस्थान समितीने थोडीफार दुरुस्ती केली पण मंदिराच्या सुरेख सभामंडपाचे दगड फुटले आहेत. शेकडो वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस सहन करत असलेल्या मंदिराचा बराच भाग जीर्ण झाला आहे.
ऐतिहासिक किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम भारतीय पुरातत्त्व विभागाने सन २०१५ मध्ये हाती घेतले. चार-पाच वर्षे किल्ल्याच्या दर्शनी भागातील मुख्य दरवाजाच्या दुरुस्तीचे काम चालले. जानेवारी २०२० पासून किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम कायमचे थांबले. २१ एप्रिल १९४५ च्या प्राचीन स्मारक तथा पुरातत्त्वीय स्थळ आणि अवशेष १९५८ च्या अंतर्गत वैरागड येथील किल्ला, भंडारेश्वर मंदिर पुरातत्त्व स्थळ म्हणून घोषित केले आहे. भंडारेश्वर मंदिराच्या डागडुजीचे काम बऱ्याच प्रमाणात झाले.